आयपीएल 2024 चा पहिला सामना मागील आठवड्यात गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात चेपॉक स्टेडियमवर खेळला गेला. त्या सामन्यात महेंद्रसिंह धोनी फिल्डिंग सेट करताना दिसला होता. कॅमेरामनही नवीन कर्णधार ऋतुराज गायकवाडऐवजी एमएस धोनीवरच वारंवार लक्ष केंद्रित करत होता.
वीरेंद्र सेहवाग आणि सुरेश रैना यांसारख्या समालोचकांनी, ऋतुराजला कर्णधारपद देऊनही मैदानावर धोनीच कर्णधार असल्याबद्दल खिल्ली उडवली होती. असंच काहीसं दृश्य मंगळवारी गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यादरम्यानही पाहायला मिळालं. आता सामन्यानंतर चेन्नईचा वेगवान गोलंदाज दीपक चहर यांनं सीएसकेच्या खेळाडूंच्या वतीनं स्पष्टीकरण दिलं आहे.
चेन्नई सुपर किंग्जचा वरिष्ठ वेगवान गोलंदाज दीपक चहर यानं धोनीसह ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाबद्दल एक मनोरंजक विधान केलं आहे. चहर म्हणतो की त्याला सामन्यादरम्यान सूचनांसाठी धोनी आणि ऋतुराज दोघांकडेही पाहावं लागतं. मंगळवारी रात्री गुजरात टायटन्सवर एकतर्फी विजय मिळवल्यानंतर, जेव्हा महान क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध समालोचक सुनील गावस्कर यांनी दीपक चहरला विचारलं की तो क्षेत्ररक्षणासाठी कोणाकडे पाहतो – धोनी की ऋतुराज? तेव्हा चहरनं हसत उत्तर दिलं, “आजकाल फील्ड सेटिंग आणि बॉलिंग बदलांसाठी मला माहीभाई आणि ऋतुराज दोघांकडेही पाहावं लगातं. त्यामुळे कुठे पाहावं याबद्दल थोडा संभ्रम आहे. परंतु ऋतुराज चांगला कर्णधार आहे आणि तो बरंच काही शिकत आहे.”
सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, गुजरात टायटन्सनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना चेन्नईचा कर्णधार ऋतुराज गायकवाडनं पहिल्याच षटकातच मिळालेल्या जीवदानाचा फायदा घेतला. ऋतुराजनं 36 चेंडूत 46 धावा केल्या.
2022 पासून, ऋतुराज डावखुऱ्या वेगवान गोलंदाजांविरुद्ध फलंदाजी करताना थोडा अडचणीत वाटला आहे. ऋतुराजनं 2022 पासून डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाविरुद्ध आठ वेळा विकेट गमावली आहे. कदाचित ही आकडेवारी लक्षात घेऊन गुजरातनं पुन्हा एकदा डावखुरा वेगवान गोलंदाज स्पेन्सर जॉन्सनला आक्रमणात उतरवलं. त्यांची ही रणनीती कामाला आली आणि त्यानं ऋतुराजची विकेट घेतली.
महत्त्वाच्या बातम्या-
टी20 क्रिकेटमध्ये हे दुर्मिळच! गुजरातविरुद्ध ऋतुराज-रहाणेचा अनोखा कारनामा
वय फक्त आकडा! 42वर्षीय धोनीची जबरदस्त डाईव्ह, झेल पकडल्यावर सहकारीही आश्चर्यचकित