भारत विरुद्ध श्रीलंका संघात 3 सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिला सामना मंगळवारी (03 जानेवारी) मुंबईच्या वानखेडे स्टेडियम येथे पार पडला. या सामन्यात युवा वेगवान गोलंदाज शिवम मावी (Shivam Mavi Debute) याने आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. आपल्या पहिल्याच आंतरराष्ट्रीय सामन्यात त्याने शानदार गोलंदाजीचा नमुना सादर करत श्रीलंकेला पराभूत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. मात्र, त्याचा इथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता.
या मालिकेत प्रमुख गोलंदाज म्हणून खेळत असलेल्या अर्शदीप सिंग याला सामन्याआधी ठीक वाटत नसल्याने मावीला पदार्पणाची संधी मिळाली. मागील चार वर्षापासून आयपीएल व देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी केल्यानंतर त्याला भारतीय संघात निवडण्यात आले होते. आपल्या पहिल्याच सामन्यात त्याने 4 षटकात केवळ 22 धावा देत 4 बळी आपल्या नावे केले. भारताकडून टी20 पदार्पणात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या गोलंदाजांत तो तिसऱ्या स्थानी आला.
परंतु, इथपर्यंत पोहोचण्याचा त्याचा प्रवास अतिशय अवघड राहिला आहे. त्याचे वडील उद्योगपती आहेत. मात्र, त्यांनी सुरुवातीला शिवम याला क्रिकेट खेळण्यासाठी पाठिंबा दिला नव्हता. त्याने डॉक्टर किंवा इंजिनियर व्हावे अशी त्यांची इच्छा होती. मात्र, शिवमने लहानपणापासून क्रिकेटपटू होण्याचे स्वप्न पाहिलेले. अनेकदा वडिलांपासून लपवून तो ट्रायलसाठी जात असे. क्रिकेटसाठी वडिलांच्या शिव्या देखील त्याला खाव्या लागल्या. परंतु, अशीच मजल दरमजल करत तो भारताच्या अंडर नाईन्टीन संघापर्यंत येऊन पोहोचला.
न्यूझीलंडमध्ये झालेल्या 2018 अंडर 19 विश्वचषक स्पर्धेतून त्याला ओळख मिळाली. पृथ्वी शॉ याच्या नेतृत्वात भारतीय संघाने हा विश्वचषक आपल्या नावे केला होता. मावी व कमलेश नागरकोटी यांनी आपल्या वेगाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तिथून पुढे त्यांना आयपीएलमध्ये सतत संधी मिळाली व मंगळवारी त्याने भारतीय संघासाठी खेळण्याचे आपले स्वप्न साकार केले.
या प्रवासात सध्या भारतीय संघाचे प्रशिक्षक असलेल्या राहुल द्रविड यांची त्याला साथ लाभली. अंडर 19 विश्वचषकावेळीही द्रविड हेच भारतीय संघाचे प्रशिक्षक होते. त्यावेळी त्यांनी मावीला “तू पैशाकडे वाहवत जाऊ नको. जितके जास्त क्रिकेट खेळशील. खेळावर मेहनत घेशील तितका पैसा येत राहील.” हा सल्ला दिला होता. स्वतः मावी द्रविड यांची आपल्या कारकीर्दीत आत्तापर्यंत सर्वात मोठी भूमिका राहिल्याचे मान्य करतो.
(Shivam Mavi Said Rahul Dravid Play Vital Role In My Career)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रिषभ पंतबाबत मोठी अपडेट! स्टार विकेटकीपरवर पुढील उपचार मुंबईमध्ये होणार
INDvSL: विकेट घेण्यात हार्दिक अपयशी, मात्र नोंदवला अनोखा विक्रम! ‘ही’ कामगिरी करणारा पहिलाच भारतीय कॅप्टन