भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या कसोटी मालिकेत भारतीय संघाने ३-१ ने विजय मिळवला आहे. या मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यात पदार्पण करणाऱ्या अक्षर पटेलने मालिकेत महत्वाची भूमिका बजावली. तसेच अक्षर पटेल, आर अश्विननंतर मालिकेत सर्वाधिक गडी बाद करणारा दुसरा गोलंदाज आहे. त्याचमुळे माजी पाकिस्तानी गोलंदाजाने अक्षर पटेल बद्दल भविष्यवाणी करत तो एक विशेष कीर्तिमान करू शकतो, असे म्हंटले आहे.
या मालिकेत अक्षर पटेलने आपल्या उत्कृष्ट फिरकी गोलंदाजीने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे. त्याने आतापर्यंत ३ कसोटी सामने खेळले आहेत. यात त्याने एकूण २७ गडी बाद केले आहेत. तसेच चौथ्या सामन्यात फलंदाजी करताना त्याने महत्वाच्या ४३ धावा केल्या आणि पाच गडी देखील बाद केले. म्हणूनच माजी पाकिस्तानी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर यांनी अक्षर पटेल, कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद १०० गडी बाद करेल अशी भविष्यवाणी केली आहे. तसेच त्याने भारतीय संघाचे कौतुक देखील केले आहे.
खेळपट्टीमध्ये नव्हता काही दोष
इंग्लंड संघाने केलेल्या निराशाजनक कामगिरी बद्दल शोएब अख्तरने म्हंटले की, “जर खेळपट्टी मध्ये खराबी असती तर भारतीय फलंदाजांनी धावा कशा काढल्या असत्या. ज्या खेळपट्टीवर इंग्लंड संघाने फलंदाजी केली त्याच खेळपट्टीवर भारतीय संघाने ३६५ धावा केल्या. तसेच जर वॉशिंग्टन सुंदर आणि रिषभ पंत धावा करू शकतात तर इंग्लिश फलंदाजांना धावा करण्यात अपयश का आले”, असा प्रश्न देखील त्याने उपस्थित केला आहे.
अश्विन आणि अक्षरच्या जोडीने केली कमाल
पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर दुसऱ्या कसोटी सामन्यात पदार्पण करणाऱ्या अक्षर पटेलने आर अश्विन सोबत मिळून भारतीय संघाच्या गोलंदाजीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. अक्षरने या मालिकेत एकूण २७ गडी बाद केले. तर आर अश्विनला ३२ गडी बाद करण्यात यश आले. या दोघांनीही इंग्लिश फलंदाजांना आपल्या गोलंदाजीच्या तालावर नाचवले.
महत्वाच्या बातम्या:
जो रुटचे मोठे मनं! पराभवानंतरही भारताला दिल्या कसोटी चॅम्पियशीपसाठी शुभेच्छा; म्हणाला
जयसूर्याचे लाजवाब क्षेत्ररक्षण पाहून लाराला आवरला नाही कौतुक करण्याचा मोह, पाहा व्हिडिओ