क्रिकेटप्रेमींची एक हजारपेक्षाही जास्त दिवसांची प्रतिक्षा अखेर गुरुवारी (08 सप्टेंबर) संपली. या दिवशी भारत विरुद्ध अफगाणिस्तान संघात झालेल्या आशिया चषक 2022 च्या शेवटच्या सुपर-4 सामन्यात विराट कोहली याने झंझावाती शतक झळकावले. त्याच्या या शतकी खेळीच्या जोरावर भारताने अफगाणिस्तानला 101 धावांनी पराभूत केले आणि आशिया चषकाचा गोड शेवट केला. यानंतर विराटचे कौतुक करताना पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याने विराटला आणि विराटची पत्नी अनुष्का शर्मा यांना विशेष नावे दिली आहेत.
विराटने या सामन्यात 61 चेंडूत नाबाद 122 धावा केल्या. या खेळीसाठी त्याने 6 षटकार आणि 12 चौकार मारले. शतक पूर्ण करण्यासाठी त्याला एकूण 53 चेंडू खेळावे लागले. या खेळीसाठी त्याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
आपली ही खेळी त्याने पत्नी अनुष्का आणि मुलगी वामिका कोहली हिला समर्पित केली. तो म्हणाला की, “मागील दीड वर्षात मी खूप काही शिकलो आहे. येत्या एका महिन्यात मी 34 वर्षांचा होणार आहे. यासाठी हे शतक माझ्यासाठी खूप खास आहे. खरे तर मीच या शतकाने चकित झालो आहे. माझे हे शतक मी अनुष्का आणि वामिकाला समर्पित करतो. त्यांनी मला माझ्या कठीण काळात मानसिकरित्या कसे मजबूत राहायचे, हे शिकवले. त्यांची मला फार मदत झाली.”
विराटच्या याच वक्तव्यावर अख्तरने प्रतिक्रिया दिली आहे. त्याने विराटला ‘मॅन ऑफ स्टील’ आणि अनुष्काला ‘आयरन लेडी’ असे म्हटले आहे.
आपल्या यूट्यूब चॅनलवर विरुष्काचे कौतुक करताना अख्तर म्हणाला की, “विराट सामन्यानंतर म्हणाला की, तिने माझ्या कारकिर्दीतील सर्वात वाईट स्थिती पाहिली आहे. तो त्याच्या पत्नीबद्दल बोलत होता. अनुष्काला सलाम, अतिउत्तम. तू आयरन लेडी आहेस तर मिस्टर विराट स्टिलने बनलेला मनुष्य आहे.”
तसेच पुढे बोलताना अख्तर म्हणाला की, “71व्या शतकासाठी तुझे अभिनंदन विराट. तू खूप लवकर भावूक होतोस आणि तू खूप चांगला माणूस आहेस. तू नेहमी सत्याचे समर्थन करतोस आणि त्याचमुळे तुझ्या कारकिर्दीच्या शेवटी तुझ्यासोबत काहीही वाईट होणार नाही. आठवण ठेव, तुला नेहमी क्रिकेटमधील महान खेळाडूच्या रूपात आठवण ठेवले जाईल.”
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
प्रिय विराट… पत्रास कारण की…
याला म्हणतात क्रेझ! विराटच्या शतकानंतर कोणी हॉस्टेल तर कोणी केला रस्त्यावर जल्लोष; पाहा व्हिडिओ
घणाघाती शतकासह विराटने 16 वर्षातील मोठा विक्रम करून घेतला नावे; रोहित पडला मागे






