---Advertisement---

कायमची थांबणार ‘रावळपिंडी एक्सप्रेस’! पुन्हा धावू शकणार नाही अख्तर; ‘हे’ आहे कारण

On: सोमवार, नोव्हेंबर 22, 2021 11:18 PM
---Advertisement---

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात वेगवान चेंडू टाकणारा गोलंदाज म्हणून ओळख असलेला शोएब अख्तर आपल्या क्रिकेट कारकिर्दीनंतरही अनेकदा चर्चेत राहिला आहे. तो आपल्या वक्तव्यांनी अथवा कृतीने नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असतो. आता अख्तर बाबतीत एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. त्याने केलेल्या ट्विटमुळे चाहत्यांना त्याच्याबद्दल सहानुभुती वाटतेय.

अख्तरने केले भावनिक ट्विट
शोएब अख्तर याने आपल्या ट्विटर हँडलवरून त्याने छायाचित्र नुकतेच शेअर केले. यामध्ये तो धावल्यानंतर घामाघूम झालेला दिसत आहे. मात्र, त्याने या छायाचित्राला दिलेल्या कॅप्शनमुळे सर्वजण भावनिक झाले. त्याने कॅप्शन देत लिहिले,
‘माझे धावण्याचे दिवस संपले आहेत. मी लवकरच ऑस्ट्रेलियामध्ये माझे पूर्ण गुडघे बदलून घेणार (नी ट्रान्सप्लांट) आहे.’
ही शस्त्रक्रिया झाल्यानंतर अख्तर अजिबात धावू शकणार नाही. त्यामुळे एकेकाळचा सर्वात वेगवान गोलंदाज हा पुन्हा मैदानावर दिसण्याची शक्यता मावळली आहे.

शानदार राहिली कारकीर्द
पाकिस्तानसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवलेला व जगातील सर्वात वेगवान गोलंदाज ठरलेल्या अख्तरने तब्बल १५ वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाकिस्तानचे प्रतिनिधित्व केले. त्याने आपल्या कारकिर्दीमध्ये ४६ कसोटीमध्ये १६७ बळी, १६३ वनडेमध्ये २४७ बळी व १५ टी२० सामन्यात १९ बळी त्यांनी टिपले होते. अख्तर याने २०११ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्यानंतर तो समालोचक म्हणून आपली दुसरी इनिंग खेळत आहे.

हरभजनशी झाला होता वाद
नुकत्याच झालेल्या टी२० विश्वचषकात पाकिस्तान संघाने भारतीय संघाला पराभूत केल्यानंतर अथर आणि भारताचा दिग्गज फिरकीपटू हरभजनसिंग यांच्या दरम्यान काहीसा वाद झाला होता. मात्र, दोघांनीही यावर पडदा टाकत आम्ही मित्र असल्याने नेहमीच अशाप्रकारे भांडत असतो असे म्हटले होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---