पाकिस्तानचा दिग्गज वेगवान गोलंदाज शोएब अख्तर हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर ही सतत वादात सापडत असतो. सध्या सुरू असलेल्या टी२० विश्वचषकाच्या एका सामन्यानंतर एका टीव्ही वाहिनीवर प्रसारित होत असलेल्या चर्चेदरम्यान सूत्रसंचालकाशी वाद झाल्याने त्याने चर्चा अर्ध्यावर सोडत कार्यक्रम अर्ध्यावर निघून जाण्याचा निर्णय घेतला होता. आता पाकिस्तानमधील एका मंत्र्याने अख्तर व त्या सूत्रसंचालकाची दिलजमाई करून आणली आहे. याबाबत ट्विट करत माहिती देण्यात आली.
काय होते प्रकरण?
टी२० विश्वचषकातील पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड सामन्यानंतर एका सरकारी वाहिनीवर चर्चा आयोजित केली गेली होती. या चर्चेमध्ये अख्तरव्यतिरिक्त वेस्ट इंडीजचे दिग्गज विवियन रिचर्ड्स, इंग्लंडचे डेव्हिड गॉवर, पाकिस्तानचा उमर गुल, आकीब जावेद, रशिद लतिफ व पाकिस्तानची माजी महिला क्रिकेटपटू सना मीर हे सहभागी झाले होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नौमन नियाज हे करत होते.
चर्चेदरम्यान अख्तर पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हॅरिस रौफ व प्रशिक्षक आकीब जावेद यांचे कौतुक करत होता. मात्र, सूत्रसंचालक नियाज याने अख्तर याला मध्येच थांबवले. यामुळे अपमानित झालेल्या अख्तर याने माईक काढत कार्यक्रमातून बाहेर जाण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे नियाज याने त्याला थांबवण्याचा प्रयत्नही केला नाही. त्यानंतर नाराज झालेल्या अख्तरने यावर प्रतिक्रिया दिली होती.
دوست دو چار نکلتے ہیں کہیں لاکھوں میں
جتنے ہوتے ہیں سوا اتنے ہی کم ہوتے ہیں۔۔۔۔۔۔۔۔ بات اتنی نہیں تھی کہ اس پر اتنی گفتگو ہوتی لیکن کیا ہے کہ سوشل میڈیا اب اتنا بڑا ہے کہ چھوٹی باتیں بھی بڑی ہو جاتی ہیں، بہرحال All is well that ends well #GameOnHai #PTV pic.twitter.com/TLsGjfUw13
— Ch Fawad Hussain (@fawadchaudhry) November 13, 2021
चौधरी यांनी केलेली दिलजमाई
या दोघांमधील वादानंतर पाकिस्तान सरकारमधील मंत्री फवाद चौधरी यांनी दोघांना घरी बोलावून नवी मैत्री करण्यास सांगितले. दोघांमध्ये दिलजमाई झाल्याचे ट्विट खुद्द चौधरी यांनी केले. तसेच ज्या वाहिनीवर हा प्रकार घडला होता, त्या वाहिनीनेही याबद्दल ट्विट केले आहे.