ॲडलेडमध्ये खेळल्या गेलेल्या दिवस-रात्र कसोटी सामन्यात भारताला दारुण पराभवाला सामोरं जावं लागलंय. ऑस्ट्रेलियानं हा सामना अवघ्या सात सत्रात 10 गडी राखून जिंकला. अडीच दिवसांच्या खेळात भारतीय संघ कधीही सामन्यात दिसला नाही. संपूर्ण सामन्यावर ऑस्ट्रेलियाची पकड कायम होती.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी क्रिकेटच्या इतिहासात चेंडूंच्या बाबतीत हा सर्वात लवकर संपणारा सामना आहे. चला तर मग, या बातमीद्वारे दोन्ही देशांदरम्यान खेळल्या गेलेल्या सर्वात कमी वेळ चाललेल्या सामन्यांबद्दल जाणून घेऊया.
(5) ॲडलेड 2020 (1246 चेंडू) – 2020 मध्ये ॲडलेडमध्ये खेळली गेलेली पिंक बॉल कसोटी केवळ 1246 चेंडूत संपली होती. पहिल्या डावात भारतीय संघ 93.1 षटकात 244 धावांवर सर्वबाद झाला होता. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 72.1 षटकांत 191 धावाच करू शकला. पहिल्या डावात आघाडी मिळूनही भारताचा दुसरा डाव अवघ्या 21.2 षटकांत 36 धावांवर आटोपला होता. यानंतर ऑस्ट्रेलियानं छोट्या लक्ष्याचा पाठलाग अवघ्या 21 षटकांत केला.
(4) मुंबई 2004 (1213 चेंडू) – 2004 मध्ये मुंबईत खेळल्या गेलेल्या कसोटीच्या पहिल्या डावात भारतीय संघ 41.3 षटकात 104 धावांवर ऑलआऊट झाला होता. प्रत्युत्तरात, ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात 61.3 षटकात 203 धावा करता आल्या. भारताचा दुसरा डाव 68.2 षटकात 205 धावांवर संपला. 107 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा संघ 30.5 षटकांत 93 धावांत ऑलआऊट झाला आणि भारतानं 13 धावांनी सामना जिंकला.
(3) पर्थ 2012 (1200 चेंडू) – 2012 मध्ये पर्थ येथे खेळली गेलेली कसोटी ऑस्ट्रेलियानं एक डाव आणि 37 धावांनी जिंकली होती. भारताचा पहिला डाव 60.2 षटकात 161 धावांवर ऑलाऊट झाला. प्रत्युत्तरात, ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 76.2 षटकांत 369 धावांत आटोपला. भारताचा दुसरा डावही 63.2 षटकात 171 धावांवर संपला आणि भारतानं हा सामना एका डावानं गमावला.
(2) इंदूर 2023 (1135 चेंडू) – गेल्या वर्षी इंदूरमध्ये खेळल्या गेलेल्या कसोटीत ऑस्ट्रेलियानं भारताचा नऊ गडी राखून पराभव केला होता. पहिल्या डावात भारताची धावसंख्या केवळ 33.2 षटकांत 109 एवढी होती. ऑस्ट्रेलियानं पहिल्या डावात 76.3 षटकात 197 धावा केल्या. भारताचा दुसरा डाव 60.3 षटकात 163 धावांवर संपला. ऑस्ट्रेलियानं 18.5 षटकांत हे सोपं लक्ष्य गाठलं.
(1) ॲडलेड 2024 (1031 चेंडू) – ॲडलेड येथे झालेल्या सलग दुसऱ्या गुलाबी चेंडू कसोटीतही ऑस्ट्रेलियानं भारताचा पराभव केला. या सामन्याच्या पहिल्या डावात भारतानं केवळ 44.1 षटकं तर दुसऱ्या डावात केवळ 36.5 षटकंच खेळली. दोन्ही डाव एकत्र केले तर भारतानं सामन्यात केवळ 81 षटकंच फलंदाजी केली. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियानं पहिल्या डावा 87.3 षटकं फलंदाजी केली. हा सामना दोन्ही संघांमधील कसोटीतील सर्वात कमी चेंडूचा सामना ठरला.
हेही वाचा –
ॲडलेडमध्ये सर्वच फेल! या 3 खेळाडूंमुळे झाला भारताचा पराभव
WTC इतिहासातील सर्वात यशस्वी वेगवान गोलंदाज! पॅट कमिन्सनं मोडला बुमराहचा मोठा रकॉर्ड
कसोटीत सलग पराभव, रोहित शर्माच्या नावे लज्जास्पद रेकॉर्ड; या नकोशा लिस्टमध्ये एंट्री