टीम इंडियाचे दिग्गज खेळाडू रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यासाठी गेले काही कसोटी सामने चांगले राहिले नाहीत. दोन्ही खेळाडू घरच्या परिस्थितीत संघर्ष करताना दिसले आहेत. भारतानं बांगलादेशविरुद्ध 2-0 असा विजय मिळवला असला तरी टीम इंडियाला न्यूझीलंडकडून 3-0 असा मानहानीकारक पराभव स्वीकारावा लागला. या पराभवानंतर विराट आणि रोहितला कसोटी संघातून वगळण्यात यावं का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यापूर्वी विराट-रोहितची गेल्या काही कसोटी सामन्यांमधील आकडेवारी काय आहे, हे आपण या बातमीद्वारे जाणून घेऊया.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या सुरुवातीपासूनच न्यूझीलंडचा संघ विदेशी भूमीवर संघर्ष करत आहे. परंतु टॉम लॅथमच्या नेतृत्वाखालील किवी संघानं भारताचा भारतामध्ये 3-0 असा व्हाईटवॉश करून सर्व टीकाकारांना उत्तर दिलं. या मालिकेत विराट कोहली आणि रोहित शर्मा अजिबात लयीत दिसले नाहीत. या दोन्ही खेळाडूंपैकी एकानं जरी या मालिकेत सातत्यपूर्ण फलंदाजी केली असती, तर परिणाम निश्चितच वेगळे लागले असते. रोहित शर्मानं कसोटीच्या गेल्या 10 डावात केवळ 133 धावा केल्या आहेत. तर विराट कोहलीनं 192 धावा केल्या आहेत. गेल्या दोन मालिकेत दोन्ही फलंदाजांना मिळून केवळ दोनच अर्धशतकं करता आली.
रोहित शर्माची आकडेवारी
जून 2024 मध्ये टी20 विश्वचषक जिंकल्यानंतर रोहित शर्माच्या कामगिरीत घसरण झाली आहे. रोहितनं तेव्हापासून पांढऱ्या चेंडूप्रमाणेच लाल चेंडूच्या क्रिकेटमध्येही आक्रमण करण्याचा मार्ग स्वीकारला. परंतु तो यात यशस्वी झाला नाही. विश्वचषक जिंकल्यानंतर त्यानं 8 सामन्यात भारताचं नेतृत्व केलं, ज्यापैकी 5 सामन्यात संघ पराभूत झाला आहे. टीम इंडियानं दोन सामने जिंकले आणि एक सामना बरोबरीत राहिला. या वर्षाच्या सुरुवातीला रोहितनं इंग्लंडविरुद्ध कठीण परिस्थितीत घरच्या मैदानावर 400 धावा केल्या होत्या. मात्र या मालिकेत त्याला केवळ 91 धावा करता आल्या. तो बहुतांश वेळा वेगवान गोलंदाजांचा बळी ठरला.
विराट कोहलीची आकडेवारी
विराट कोहलीनं 2024 मध्ये भारतासाठी 6 कसोटी सामने खेळले आहेत, ज्यामध्ये तो 22.72 च्या सरासरीनं केवळ 250 धावा करू शकला. त्याच्या कसोटी कारकिर्दीची सरासरी 50च्या आसपास आहे. विराट 2020 पासून फिरकीपटूंविरुद्ध संघर्ष करताना दिसतोय. 2013 ते 2019 दरम्यान भारतात फिरकीपटूंविरुद्ध त्याची सरासरी 72.45 एवढी होती, जी आता 32.86 वर आली आहे. तो भारतात 57 पेकी 24 वेळा तो फिरकीपटूंचा बळी ठरला आहे.
विराट कोहलीनं देशांतर्गत क्रिकेटमध्ये शेवटचा सामना 2012 मध्ये खेळला होता. तेव्हापासून तो रणजी ट्रॉफीपासून दूर आहे. अशा परिस्थितीत या दोन खेळाडूंना वगळून देशांतर्गत क्रिकेटच्या माध्यमातून पुनरागमनाची संधी द्यावी, असं बोललं जातंय. या कसोटी मालिकेपूर्वी विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना दुलीप ट्रॉफीमध्ये खेळण्याची संधी होती, पण या दोघांनी नकार दिला होता. चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणेसारख्या खेळाडूंना कसोटी संघात पुनरागमन करण्यासाठी देशांतर्गत क्रिकेट खेळण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तर मग विराट कोहली आणि रोहित शर्माच्या बाबतीतही असं व्हायला नको का? असा प्रश्न सध्या विचारला जातोय.
हेही वाचा –
40 वर्षीय भारतीय यष्टीरक्षकाची निवृत्तीची घोषणा, 2010 मध्ये केलं होतं पदार्पण
विराट-रोहित सारख्या दिग्गजांनी दुलीप ट्रॉफी खेळण्यास नकार दिला होता, कारण धक्कादायक!
‘ते अजूनही खेळाडूंना समजून घेतायत’, कसोटी मालिका गमावल्यानंतर कोचिंग स्टाफबद्दल रोहितचे मत