कोविड-१९ मुळे इंडियन प्रीमियर लीग २०२१ चा हंगाम अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला आहे. सनरायझर्स हैदराबाद संघाचा दिग्गज शिलेदार डेविड वॉर्नर याच्यासाठी आयपीएलचे हे सत्र विसरण्याजोगे राहिले आहे. २०१६ साली आपल्या नेतृत्त्वाखाली त्याने हैदराबादला पहिले जेतेपद जिंकून दिले होते. परंतु या हंगामातील सुरुवातीच्या काही सामन्यांतील खराब कामगिरीमुळे त्याची नेतृत्त्वपदावरुन हकालपट्टी करण्यात आली होती.
यानंतर त्याच्या संघ सहकाऱ्यांच्या प्रतिक्रिया काय होत्या? याबाबत हैदराबादचा क्रिकेटपटू श्रीवत्य गोस्वामी याने माहिती दिली आहे. अधिकतर खेळाडूंना त्याला नेतृत्त्वपदावरुन हटवल्याने कसलाही फरक पडला नव्हता. परंतु काहींना या गोष्टीचे दु:ख वाटले असल्याचे श्रीवत्सने सांगितले आहे.
‘क्रिकेट डॉट कॉम’शी बोलताना श्रीवत्सने सांगितले की, “वॉर्नरच्या हातून संघाच्या नेतृत्त्वाची सूत्रे काढून घेतल्याने अधिकतर खेळाडूंना फरक पडला नव्हता. हा संघ व्यवस्थापकांचा वैयक्तिक निर्णय होता. याबाबत खेळाडूंना कसलीही विचारपूस करण्यात आली नव्हती. आम्हीही पूर्ण स्थितीशी सहमत होतो. परंतु काही खेळाडूंना मात्र फार पश्चाताप वाटत होता. आम्ही चांगल्या खेळाडू वृत्तीसह खेळत होतो आणि उरलेले सामने जिंकण्यासाठी आमचे सर्वोत्कृष्ट देण्याच्या तयारीत होतो.”
“जर तुम्ही याबाबतीत स्वत: डेविड वॉर्नर किंवा केन विलियम्सन किंवा संघ व्यवस्थापनाला काही विचारले तर वेगवेगळ्या बाजू पुढे येतील. आमच्यासारखे देशांतर्गत क्रिकेटमधील खेळाडू, ज्यांनी वॉर्नरच्या नेतृत्त्वाखाली जास्त सामने खेळले नव्हते आणि या निर्णयामध्येही आम्हाला सहभागी करण्यात आले नव्हते. त्यामुळे आम्हाला याचा कसलाही फरक पडला नाही,” असे श्रीवत्सने शेवटी सांगितले.
डेविड वॉर्नरच्या नेतृत्त्वाखाली हैदराबाद संघाने आयपीएल २०२१ मध्ये एकूण ६ सामने खेळले होते. त्यातील पंजाब किंग्जविरुद्धचा हंगामातील एकमेव चौदावा सामना जिंकण्यात त्यांना यश आले होते. ९ विकेट्सने हैदरबादने त्या सामन्यात बाजी मारली होती. परंतु उर्वरित पाचही सामन्यात हैदराबादला काही अंतराने पराभवाला सामोरे जावे लागले होते.
त्यामुळे राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या (हंगामातील २८ वा सामना) सामन्यापुर्वी वॉर्नरच्या हातून संघाच्या नेतृत्त्वाची सूत्रे काढून घेत केन विलियम्सनवर ही जबाबदारी सोपवण्यात आली होती. परंतु या सामन्यातही राजस्थानने ५५ धावांनी एकहाती विजय मिळवला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
इरफानवर आपल्या सुनेसोबत अवैध संबंध ठेवल्याचा गंभीर आरोप करणाऱ्या वृद्ध दांपत्याची माघार, म्हणाले…
चॅपेल यांच्या भडकण्याचे कारण ऐकून व्हीव्हीएस लक्ष्मणही झाला होता चकीत, वाचा काय होते कारण