गुरुवारी (15 जून) आशियाई क्रिकेट परिषदेने आशिया चषकाच्या तारखांची घोषणा केली. नियोजित कार्यक्रमानुसार हा आशिया चषक पाकिस्तानमध्ये होणार होता. मात्र, इतर देशांनी विरोध केल्याने ही स्पर्धा आता श्रीलंका व पाकिस्तानात संयुक्तरीत्या आयोजित केली जाईल. या आशिया चषकासाठी भारतीय संघाला विजेतेपदाचा दावेदार मानला जात आहे. त्याचवेळी या स्पर्धेसाठी आता श्रेयस अय्यर व जसप्रीत बुमराह हे पुन्हा एकदा भारतीय संघात पुनरागमन करू शकतात.
आशिया चषकासाठी भारतीय संघ रोहित शर्माच्या नेतृत्वात उतरेल. या संघात अनेक प्रमुख खेळाडूंची जागा निश्चित असणार आहे. यामध्ये विराट कोहली, शुबमन गिल, हार्दिक पंड्या हे रोहितसह फलंदाजी मजबूत बनवतील. तर, गोलंदाजी विभागात अष्टपैलू रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी व मोहम्मद सिराज यांची जागा नक्की आहे.
असे असतानाच मागील बऱ्याच काळापासून भारतीय संघातून बाहेर असलेले श्रेयस अय्यर व जसप्रीत बुमराह हे आशिया चषकातून पुनरागमन करण्याची शक्यता आहे. बुमराहने मागील वर्षी सप्टेंबर महिन्यानंतर कोणताही क्रिकेटचा सामना खेळलेला नाही. तर, यावर्षी मार्च महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या मालिकेनंतर मैदानावर आलेला नाही. त्यामुळे हे दोन्ही खेळाडू संघात आल्यास भारतीय संघाची ताकद वाढेल.
यावेळी आशिया चषक 31ऑगस्ट ते 17 सप्टेंबर या काळात खेळला जाईल. स्पर्धेत एकूण 13 सामने खेळले जाणार असून, 9 सामने श्रीलंकेत तर चार सामने पाकिस्तानात होतील. या स्पर्धेत भारतासह श्रीलंका, पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान व नेपाळ हे संघ सहभागी होतील.
(Shreyas Iyer And Jasprit Bumrah Will Comeback From Asia Cup)
महत्वाच्या बातम्या-
रैनासोबत घाणेरडी चेष्टा! LPLसाठी केली नव्हती नोंदणी, तरीही लिलावात आलं नाव; पण…
‘वनडे विश्वचषकात टॉप-4मध्ये पोहोचणार पाकिस्तान’, दिग्गजाचा मोठा दावा





