भारतीय संघातील युवा खेळाडू पृथ्वी शॉ आणि श्रेयस अय्यर हे दोघेही सध्या भारतीय संघातून बाहेर आहेत. श्रेयस अय्यरला मागील इंग्लंड संघाविरुद्ध झालेल्या वनडे मालिकेत दुखापत झाली होती. त्यामुळे तो संघाबाहेर झाला होता. तसेच पृथ्वी शॉ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील कसोटी मालिकेत मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा घेऊ शकला नव्हता. म्हणून त्याला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. परंतु, क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी पुढे येत आहे. हे दोघेही लवकरच पुन्हा मैदानात उतरू शकतात.
इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेत कडक बायो बबल असताना देखील कोरोनाचा शिरकाव झाल्याचे पाहायला मिळाले होते. त्यामुळे आयपीएल स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली होती. परंतु काही दिवसांपुर्वीच बीसीसीआयने घोषणा केली आहे की, आयपीएल २०२१ हंगामातील राहिलेल्या सामन्यांचे आयोजन येत्या सप्टेंबर महिन्यात करण्यात येणार आहे. या स्पर्धेत श्रेयस अय्यर आणि पृथ्वी शॉ हे दोघेही दिल्ली कॅपिटल्स संघासाठी खेळताना दिसून येतील. तत्पूर्वी या खेळाडूंना श्रीलंकेचा दौरा करायचा आहे.
श्रेयस अय्यरने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक स्टोरी शेअर केली आहे, ज्यामध्ये तो आणि पृथ्वी शॉ जॉगिंग करताना दिसत आहेत. यामुळे कर्णधार आणि सलामीवीराची ही जोडी पुन्हा एकदा क्रिकेटचे मैदान गाजवताना दिसण्याची शक्यता आहे. आयपीएल २०२१ स्पर्धेपूर्वी जुलै महिन्यात भारतीय संघाला श्रीलंका संघाविरुद्ध तीन वनडे आणि तीन टी-२० सामन्यांची मालिका खेळायची आहे. या दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी श्रेयस अय्यरला पूर्णपणे फिट होणे गरजेचे असणार आहे. यासोबतच त्याला भारतीय संघाचे कर्णधारपद देखील दिले जाऊ शकते.
https://www.facebook.com/permalink.php?story_fbid=311225130541314&id=101572798173216
पृथ्वी शॉने विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेपासून उंच भरारी घेतली आहे. या स्पर्धेत धावांचा डोंगर उभारल्यानंतर त्याने आयपीएल २०२१ स्पर्धेत आपल्या संघासाठी उल्लेखनीय कामगिरी केली होती. यासोबतच शिवम मावीच्या एकाच षटकात त्याने ६ चौकार लगावले होते.
असे पहिल्यांदाच होणार आहे, जेव्हा २ भारतीय संघ एकाच वेळी दोन वेगवेगळ्या संघाविरुद्ध मालिका खेळतील. येत्या १८ जून ते २२ जूनपासून भारत आणि न्यूझीलंड यांच्यात विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळला जाणार आहे. त्यानंतर त्यांना इंग्लंडविरुद्ध ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘ऑस्ट्रेलिया-इंग्लंड विरुद्ध चमकणारा पंत १०० कसोटी सामने खेळेल,’ अनुभवी यष्टीरक्षकाची भविष्यवाणी
जेव्हा भारतीय संघाच्या अकराच्या अकरा खेळाडूंनी केली होती गोलंदाजी, वाचा त्या सामन्याबद्दल
इंग्लंड न्यूझीलंडविरुद्ध लॉर्ड्स कसोटी अनिर्णित राखण्यास यशस्वी, पण आयसीसीने केली ‘ही’ मोठी कारवाई