इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामाला जेव्हा सुरुवात झाली होती, तेव्हा काही क्रिकेटपटू दुखापतीमुळे स्पर्धेत सहभागी होऊ शकले नव्हते. यामध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाचा नियमित कर्णधार श्रेयस अय्यरचाही समावेश होता. त्याच्याऐवजी या हंगामात रिषभ पंतने नेतृत्व केले होते. पण, हा हंगाम २९ सामन्यांनंतर कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे स्थगित करण्यात आला. आता हा उर्वरित हंगाम सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यांत युएईमध्ये खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे, तोपर्यंत श्रेयस पूर्णपणे तंदुरुस्त होऊन आयपीएलमध्ये पुनरागमन करु शकतो, असा विश्वास त्यानेच व्यक्त केला आहे.
श्रेयसला मार्च महिन्यात इंग्लंडविरुद्ध वनडे मालिका खेळताना खांद्याची दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला एप्रिलमध्ये त्याच्या खांद्यावर शस्त्रक्रिया करुन घ्यावी लागली होती. त्याचमुळे त्याला आयपीएल २०२१ च्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये खेळता आले नव्हते. या दुखापतीतून श्रेयस आता बऱ्यापैकी सावरला असून त्याने सरावासही सुरुवात केली आहे.
तो ‘द ग्रेड क्रिकेटर्स’ या युट्यूब चॅनेलशी बोलताना म्हणाला, ‘माझा खांदा आता ठिक आहे. आता अंतिम प्रक्रियेत ताकद आणि लय मिळवण्यावर लक्ष द्यायचे आहे. त्यासाठी साधारण एक महिन्याचा कालावधी लागेल आणि सहाजिकच ट्रेनिंग चालू राहिल. याशिवाय मला असे वाटते की मी युएईमध्ये आयपीएल खेळेल.’
मात्र, जर श्रेयसने आयपीएल २०२१ मध्ये पुनरागमन केले, तर पंतकडे दिल्लीचे कर्णधारपद कायम राहाणार की श्रेयसकडे पुन्हा नेतृत्त्वाची जबाबदारी दिली जाणार हा मोठा प्रश्न दिल्लीच्या संघव्यवस्थापनासमोर असणार आहे.
याबद्दल श्रेयस म्हणाला, ‘मला कर्णधारपदाबद्दल माहित नाही, हे संघमालकांच्या हातातील निर्णय आहे. पण, संघ खूप चांगली कामगिरी करत आहे आणि आम्ही गुणतालिकेत अव्वल आहोत, हेच माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचे आहे. दिल्ली संघाला ट्रॉफी जिंकवून देणं, जी आजपर्यंत मिळवता आलेली नाही, हे माझे मुख्य लक्ष्य आहे.’
पंतने आयपीएल २०२१ हंगाम स्थगित होण्यापूर्वी श्रेयसच्या अनुपस्थितीत दिल्लीचे उत्तम नेतृत्व केले होते. दिल्लीने पंतच्या नेतृत्वाखाली या हंगामात ८ सामने खेळले होते. त्यातील ६ सामने जिंकण्यात त्यांना यश मिळाले, तर २ सामने ते पराभूत झाले. त्यामुळे १२ गुणांसह ते स्पर्धा स्थगित होण्यापूर्वी गुणतालिकेत अव्वल क्रमांकावर होते. विषेश म्हणजे पंत पहिल्यांदाच आयपीएलमध्ये कर्णधारपद सांभाळत होता. (Shreyas Iyer believes he may be fit to make a return in the IPL 2021 for Delhi Capitals when the tournament resumes.)
तसेच श्रेयसने २०१८ पासून दिल्लीचे नेतृत्त्व हाती घेतले होते. श्रेयसच्या नेतृत्वाखाली दिल्लीने चांगली कामगिरी करताना २०१९ हंगामात प्लेऑफमध्ये प्रवेश केला होता. तर २०२० हंगामात दिल्ली उपविजेते ठरले होते. श्रेयसने दिल्लीचे ४१ सामन्यांत नेतृत्व केले असून २१ सामन्यांत विजय मिळवला आहे तर १८ सामने दिल्लीला त्याच्या नेतृत्वाखाली पराभूत व्हावे लागले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
काय सांगता! एमएस धोनी झोपेतही PUBG बद्दल करतो बडबड, खुद्द पत्नी साक्षीनेच केलाय खुलासा
“राहुल सरांच्या मार्गदर्शनाखाली खेळण्यास उत्सुक”, युवा सलामीवीर झाला आनंदीत