गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा हेड कोच बनण्यापूर्वी आयपीएल चॅम्पियन कर्णधार श्रेयस अय्यरच्या आंतरराष्ट्रीय करिअरला नवसंजीवनी मिळू शकते. तो जुलै-ऑगस्टमध्ये होणाऱ्या श्रीलंकेविरुद्धच्या 3 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघात पुनरागमन करू शकतो.
बीसीसीआयनं गेल्या वर्षी श्रेयस अय्यरसह ईशान किशनला भारतीय संघाच्या केंद्रीय करारातून वगळलं होतं. हे दोघे देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळण्यास उत्सुक नसल्याचा ठपका बीसीसीआयनं त्यांच्यावर ठेवला होता. यानंतर श्रेयस अय्यरनं रणजी स्पर्धेत भाग घेतला. मुंबईकडून खेळताना त्यानं रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात 90 धावा ठोकल्या आणि संघाला विजेतेपद मिळवून देण्यात मोठं योगदान दिलं होतं.
याशिवाय 5 जुलै पासून झिम्बाब्वेविरुद्ध होणाऱ्या 5 सामन्यांच्या टी20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा पुढील आठवड्यात होणार आहे. आयपीएल 2024 मध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या अनेक युवा खेळाडूंना या मालिकेत संधी मिळू शकते. सध्या हे खेळाडू बंगळुरूतील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (एनसीए) आहेत.
बीसीसीआयच्या एका सूत्रानं सांगितलं की, “श्रेयस अय्यर सध्या एनसीएमध्ये नाही. तेथे बहुतेक असे क्रिकेटपटू आहेत ज्यांनी आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली आणि जे झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेत खेळू शकतात. या खेळाडूंमध्ये अभिषेक शर्मा, रियान पराग, मयंक यादव, हर्षित राणा, नितिश रेड्डी, विजयकुमार वैशाख आणि यश दयाल यांचा समावेश आहे.”
सूत्रानं पुढे सांगितलं की, “श्रेयस अय्यरची श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी निवड होऊ शकते. श्रेयसनं 2023 विश्वचषकात 500 पेक्षा अधिक धावा ठोकल्या होत्या. तसेच त्याची सरासरी 50 पेक्षा अधिक आहे. त्यामुळे अशा खेळाडूला संघाबाहेर ठेवता येणं शक्य नाही.”
रोहित शर्मा. विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह यांच्यासारखे वरिष्ठ खेळाडू आता एकदिवसीय आणि कसोटी फॉरमॅटमध्ये फोकस करतील. भारताला सप्टेंबर 2024 ते जानेवारी 2025 दरम्यान 9 जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचे सामने खेळायचे आहेत. झिम्बाब्वेमध्ये जाणाऱ्या भारतीय संघात रिंकू सिंह, शुबमन गिल, आवेश खान आणि खलिल अहमद यांसारख्या खेळाडूंचा समावेश केला जाऊ शकतो. तसेच हार्दिक पांड्या कर्णधार आणि सूर्यकुमार यादव उपकर्णधार असू शकतो.
महत्त्वाच्या बातम्या –
मोठी बातमी! केन विल्यमसननं न्यूझीलंडचं कर्णधारपद सोडलं, केंद्रीय करारही नाकारला
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओवर हारिस रौफनं दिली प्रतिक्रिया
मुख्य प्रशिक्षक पदासाठी पहिल्याच मुलाखतीत गंभीरनं बीसीसीआयसमोर ठेवल्या 5 अटी