आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद गेल्यावर्षापासून दर महिन्याला सर्वोत्तम पुरुष आणि महिला क्रिकेटपटूची (Player of the Month) निवड करते. या पुरस्कारासाठी आधी प्रत्येकी तीन खेळाडूंना मानांकन दिले जाते आणि त्यातून एका खेळाडूची निवड होते. दरम्यान फेब्रुवारी २०२२ या महिन्यासाठी भारताचा फलंदाज श्रेयस अय्यर याला पुरुष गटातून आणि भारताची कर्णधार मिताली राज आणि अष्टपैलू दिप्ती शर्मा यांना महिला गटातून या पुरस्कारासाठी मानांकन मिळाले आहे.
आयसीसीने मानांकनाची यादी जाहीर केली आहे. यानुसार श्रेयससह संयुक्त अरब अमिरातीचा फलंदाज वृत्य अरविंद आणि नेपाळचा दिपेंद्र सिंग यांनाही पुरुषांच्या गटात मानांकन मिळाले आहे. तसेच महिला गटातून न्यूझीलंडची अष्टपैलू एमेलिया केरला मिताली आणि दिप्तीसह मानंकन आहे.
फेब्रुवारीमध्ये भारतीय खेळाडूंची शानदार कामगिरी
श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) फेब्रुवारीमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध आणि श्रीलंकेविरुद्ध शानदार कामगिरी केली होती. त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध शेवटच्या वनडेत ८० आणि शेवटच्या टी२०मध्ये २५ धावा केल्या होत्या. तसेच त्याने श्रीलंकेविरुद्धच्या टी२० मालिकेतील तिन्ही सामन्यांत अर्धशतके केली होती. त्याने तीन सामन्यांत २०४ धावा केल्या होत्या आणि विशेष म्हणजे या तिन्ही सामन्यांमध्ये तो नाबाद राहिला होता. त्यामुळे त्याला मालिकावीर पुरस्कारानेही गौरविण्यात आले होते.
मिताली (Mithali Raj) आणि दिप्ती (Deepti Sharma) यांनी फेब्रुवारीमध्ये न्यूझीलंडविरुद्ध वनडे मालिकेत चांगली कामगिरी केली होती. ही मालिका भारतीय महिला संघ पराभूत जरी झाला असला, तरी या दोघींचीही कामगिरी चांगली झाली होती. मितालीने ३ अर्धशतकांसह २३५ धावा केल्या होत्या. तसेच दिप्तीने १० विकेट्स घेण्याबरोबरच ११६ धावाही केल्या होत्या.
फेब्रुवारी महिन्यातील सर्वोत्तम खेळाडूसाठी नामांकन मिळालेल्या वृत्य अरविंद याने आयसीसी टी२० विश्वचषक क्वालिफायर अ स्पर्धेत गेल्या महिन्यात चांगली कामगिरी केली होती. त्याने ५ सामन्यांत २६७ धावा केल्या होत्या. तसेच दिपेंद्र सिंगने देखील याच स्पर्धेत चांगली कामगिरी केली होती. त्याने १५९ धावा करण्यासह ६ विकेट्सही घेतल्या होत्या. तसेच एमेलिया केरने भारताविरुद्धच्या वनडे मालिकेत ३५३ धावा केल्या होत्या. तसेच ७ विकेट्स घेतल्या (ICC Player of the Month nominations for February announced).
अशा पद्धतीने दिले जातात पुरस्कार
महिन्यातील सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्काराचे विजेते निवडण्यासाठी प्रत्येक महिन्यात चाहत्यांनाही आपले मत देता येते. माजी खेळाडू, प्रसारक आणि जगभरातील पत्रकार यांचा समावेश असणारी स्वतंत्र आयसीसी व्होटिंग अकादमी चाहत्यांसह आयसीसीच्या महिन्यातील सर्वोत्तम पुरुष आणि महिला खेळाडूची निवड करण्यासाठी एकत्र येते.
आयसीसी पुरस्कार नामांकन समितीमार्फत खेळाडूंची मैदानातील कामगिरी आणि त्या महिन्याच्या कालावधीतील एकूण कामगिरीवर आधारित प्रत्येक गटातील तीन उमेदवारांची नामांकनासाठी निवड केली जाईल. त्यानंतर या तीन उमेदवारांसाठी आयसीसी व्होटिंग अकादमी आणि चाहते मतदान करतात.
व्होटिंग अकादमी आपले मत ईमेलद्वारे सुपुर्त करते. त्यानंतर, प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी आयसीसीकडे नोंदणी करुन चाहते आयसीसीच्या वेबसाइटद्वारे मतदान करू शकतात. पुरस्काराचे विजेते ठरवण्यासाठी व्होटिंग अकादमीच्या मतांना ९० टक्के तर चाहत्यांच्या मतांना १० टक्के प्राधान्य असते. त्यानंतर आयसीसीच्या डिजिटल चॅनेलवर महिन्याच्या प्रत्येक दुसर्या सोमवारी विजेत्यांची घोषणा केली जाते.
महत्त्वाच्या बातम्या –
कुलदीपनंतर आता ‘या’ गोलंदाजाचे कसोटीतील स्थान धोक्यात? दुसऱ्या सामन्यातून मिळू शकतो डच्चू
महिला विश्वचषक: भारताचा दुसरा सामना यजमान न्यूझीलंडविरुद्ध! कुठे, केव्हा होणार लढत, घ्या जाणून