India vs England Test: भारताचा नवा कसोटी कर्णधार शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. दरम्यान तरुण खेळाडूंच्या या संघाला इंग्लंडमध्ये विजय मिळवणे कठीण आहे पण अशक्य नाही. त्याच वेळी भारताचे माजी कर्णधार सौरव गांगुली म्हणाले की, इंग्लंडमधील परिस्थिती तरुण खेळाडूंसाठी आव्हानात्मक आहे पण ही त्यांच्यासाठी स्वतःला सिद्ध करण्याची संधी देखील आहे. श्रेयस अय्यरची संघात निवड न झाल्याबद्दल देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली आणि निवडकर्त्यांवर निशाणा साधला.
भारतीय संघ 20 जूनपासून पहिला कसोटी सामना खेळणार आहे, ज्यासाठी खेळाडू 7 जूनपासून इंग्लंडमध्ये सराव करत आहेत. जसप्रीत बुमराह, रिषभ पंत, करुण नायर यांचा अनुभव या दौऱ्यात नक्कीच उपयोगी पडेल परंतु इंग्लंडमधील परिस्थिती बहुतेक खेळाडूंसाठी आव्हानात्मक असणार आहे. सौरव गांगुलींनी रेव्हस्पोर्ट्झला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, “आमच्या तरुण संघाने ऑस्ट्रेलियामध्ये रोहित-विराट नसताना हे केले आहे. शुबमन गिल, साई सुदर्शन, अभिमन्यू, यशस्वी जयस्वाल, करुण नायर परतले आहेत. माझ्या मते, ही त्यांच्या सर्वांसाठी एक संधी आहे, कोणताही दबाव नाही. या परिस्थिती तुम्हाला आव्हान देतील पण तुम्हाला चमकवतील.”
या मुलाखतीत सौरव गांगुलीने श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीवरून निवडकर्त्यांवर निशाणा साधला आणि म्हटले की तो असा खेळाडू नाही की ज्याला बाहेर ठेवले पाहिजे. तो म्हणाला, “तो गेल्या एक वर्षापासून त्याचे सर्वोत्तम देत आहे, तो संघात असायला हवा होता. तो असा खेळाडू नाही की ज्याला संघाबाहेर ठेवले पाहिजे. तो आता दबावाखाली चांगले डाव खेळत आहे, जबाबदाऱ्या समजून घेत आहे, शॉर्ट बॉल देखील खेळत आहे. जरी कसोटी क्रिकेट वेगळे असले तरी तो काय करू शकतो हे पाहण्यासाठी मला त्याला या मालिकेचा भाग बनवायचे होते.” (Sourav Ganguly Statement On Shreyas Iyer)
श्रेयस अय्यरच्या कसोटी कारकिर्दीवर नजर टाकली तर त्याने 14 सामन्यांच्या 24 डावात 36.86च्या सरासरीने 811 धावा केल्या आहेत. यामध्ये 1 शतक आणि 5 अर्धशतकांचा समावेश आहे. अय्यरने फेब्रुवारी 2024 मध्ये इंग्लंडविरुद्ध शेवटची कसोटी खेळली होती. (Shreyas Iyer Test Career)
इंग्लंड दौऱ्यासाठी भारताचा कसोटी संघ- शुबमन गिल (कर्णधार), रिषभ पंत (उपकर्णधार आणि यष्टिरक्षक), यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, अभिमन्यू ईश्वरन, करुण नायर, नितीश रेड्डी, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (यष्टिरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, आकाश दीप, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव (India’s Test squad for England tour)






