भारतीय संघाचा होतकरू व मधल्या फळीतील विश्वासू फलंदाज श्रेयस अय्यर सध्या खांद्याच्या दुखापतीतून सावरत आहे. तो काही अंशी बरा झाला असला तरी, अधिकची जोखीम नको म्हणून त्याला श्रीलंका दौऱ्यावर पाठवण्यात आले नव्हते. मात्र, त्यानंतर श्रेयस लवकरच मैदानावर उतरेल अशी चाहत्यांना अपेक्षा होती. परंतु, त्याच्या चाहत्यांची पुन्हा एकदा निराशा झाली. श्रेयसने याच कारणामुळे आणखी एका मोठ्या स्पर्धेतून माघार घेतल्याचे वृत्त नक्की झाले आहे.
या संघाचे करणार होता प्रतिनिधित्व
श्रेयस अय्यर या वर्षी प्रसिद्ध काऊंटी क्लब लँकेशायरसाठी खेळणार होता. मात्र, त्याने पुन्हा एकदा दुखापत डोके वर काढू नये व तंदुरुस्ती मिळवी म्हणून, लँकेशायरसाठी न खेळण्याचा निर्णय घेतला. लँकेशायरचे संचालक पॉल ऍलॉट यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, ‘श्रेयस आमच्या संघात सामील होत नाही यामुळे आम्ही निराश झालो आहोत. अय्यरचे ओल्ड ट्रॅफर्डवर स्वागत करण्यास आम्ही उत्सुक होतो. मात्र, एखाद्या खेळाडूची तंदुरुस्ती अतिमहत्त्वाची असते. लँकशायर क्रिकेट अय्यरच्या निर्णयाचा आदर करत आहे. यासह आम्ही श्रेयस अय्यरच्या चांगल्या प्रकृतीसाठी शुभेच्छा देतो.’
श्रेयसने दिली अशी प्रतिक्रिया
खांद्याच्या दुखापतीतून बरे होत असलेल्या श्रेयस अय्यरने यावर म्हटले आहे की, ‘या मोसमात लँकेशायर संघाकडून न खेळता आल्यामुळे मी निराश आहे. लँकेशायर हा एक विख्यात क्रिकेट क्लब आहे. क्लबचा इतिहास खूप चांगला आणि दैदिप्यमान असल्याने, भविष्यात लँकेशायर संघाकडून खेळण्याची मला आशा आहे.’
इंग्लंडचा दिग्गज वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन आणि उपकर्णधार जोस बटलर लँकेशायर संघाचे प्रतिनिधित्व करतात.
मार्च महिन्यात श्रेयसला झालेली दुखापत
चालू वर्षी मार्च महिन्यात इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेदरम्यान अय्यरला मैदानात क्षेत्ररक्षण करताना दुखापत झालेली. दवाखान्यात दाखल केल्यानंतर त्याचा खांदा निखळल्याचे निदान झाले होते. या दुखापतीमुळे दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार असलेला श्रेयस आयपीएल २०२१ चा पहिला टप्पा खेळू शकला नव्हता. युएईमध्ये होणाऱ्या आयपीएलच्या उर्वरित हंगामात तो पुन्हा एकदा संघाचे नेतृत्व करताना दिसेल.
महत्त्वाच्या बातम्या –
क्रीडामंत्री मनोज तिवारी करतोय रणजी ट्रॉफीची तयारी, संघात झाली निवड
शतक करण्याचा विचार मनात आल्यानंतरही नाबाद राहण्यावर का केले फोकस? शिखर धवनने केला खुलासा