मुंबई । इंडियन प्रीमियर लीग 2020 च्या 8 व्या सामन्यात चाहत्यांना एका युवा फलंदाजाकडून शानदार खेळी पाहायला मिळाली. तो खेळाडू म्हणजे कोलकाता नाईट रायडर्सचा सलामीवीर शुभमन गिल होय. त्याला भारताचे भविष्य असल्याचे म्हटले जात आहे. या युवा फलंदाजाने शनिवारी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध नाबाद 70 धावा फटकावून आपल्या संघाला विजय मिळवून दिला. आयपीएलमधील पाचवे अर्धशतक ठोकणार्या गिलने आपल्यामध्ये संयम व परिपक्वता असल्याचे दाखवून दिले. गिलच्या खेळीने अनेक दिग्गजांची मने जिंकली. इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पीटरसनने त्याला केकेआरचा कर्णधार करण्याची मागणी केली आहे.
शुबमन गिल कोलकाताचा कर्णधार बनू शकतो?
कोलकाता नाईट रायडर्सच्या विजयानंतर आयपीएलमध्ये समालोचन करणारा केविन पीटरसन गिलच्या खेळीमुळे खूप प्रभावित झाला. त्याने या फलंदाजाचे भावी सुपरस्टार म्हणून वर्णन केले. गिल हा कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार असावा असेही तो म्हणाला. पीटरसनने गिलला ट्विटरवर टॅग करत लिहिले की, “शुबमन गिल केकेआरचा कर्णधार असावा.” भविष्यात गिल या संघाची कमान संभाळू शकेल यात शंका नाही, पण कर्णधार म्हणून दिनेश कार्तिकची ही शेवटची स्पर्धा असू शकते. कार्तिकचे कर्णधारपद कोलकाता संघाकडून खेळताना केलेल्या कामगिरीवर अवलंबून आहे.
शुबमन गिल सर्वोत्तम फलंदाज आहे
गिलने 2018 च्या19 वर्षाखालील विश्वचषकात भारतासाठी सर्वाधिक धावा केल्या. यानंतर, त्याने 2019 मध्ये आयपीएलमधील इमर्जिंग प्लेअर ऑफ द टूर्नामेंटचा पुरस्कार पटकावला. आयपीएलमध्ये आतापर्यंत या फलंदाजाने 29 सामन्यात 36 च्या सरासरीने 576 धावा केल्या असून त्यामध्ये 5 अर्धशतकांचा समावेश आहे.
भारतीय संघात योग्य संधी मिळत नाही
गिल हा एक अत्यंत प्रतिभावान फलंदाज आहे. परंतु त्याला भारतीय संघात योग्यरित्या संधी मिळत नाही. गिलने आतापर्यंत दोन वनडे सामने खेळले आहेत. नुकताच तो भारतीय कसोटी संघात दाखल झाला, पण त्याला संधी मिळाली नाही. त्यानंतर युवराज सिंगने भारताच्या निवड समितीच्या धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. जर गिलने आयपीएलमध्ये धावा केल्या, तर त्याला भारतीय संघामध्ये येण्यापासून कोणीही रोखणार नाही.