भारताने वेस्ट इंडिजचा ३ वनडे मालिकेत क्लीन स्वीप केला. टीम इंडियाने पावसाने व्यत्यय आणलेला तिसरा एकदिवसीय सामना डकवर्थ लुईस नियमानुसार ११९ धावांनी जिंकला. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताच्या विजयाचा हिरो होता शुभमन गिल. त्याने नाबाद ९८ धावांची खेळी खेळली. या सामन्यात त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिले शतक झळकावण्याची संधी होती. पण, नशिबाने साथ दिली नाही आणि पावसाने संपूर्ण खेळ उधळला. दोन धावांनी शतक हुकल्याचे गिलला वाईट वाटले. सामना संपल्यानंतर सादरीकरण समारंभात याविषयी प्रश्न विचारला असता त्याच्या वेदनांना तोंड फुटले.
शुभमन गिल म्हणाला की, “हे कडू गोळीसारखे होते. मला शतकाची आशा होती. मात्र, पाऊस पडत असल्याने ते माझ्या नियंत्रणात नव्हते. असे असूनही मी माझ्या खेळीबद्दल आनंदी आहे. पहिल्या दोन सामन्यांमध्ये चांगली सुरुवात केल्यानंतर मी ज्या प्रकारे बाद झालो त्यामुळे मी निराश झालो. तिसऱ्या सामन्यात मी सतत स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न केला. पावसामुळे विश्रांती घेतल्यानंतर आम्ही मैदानात परतलो तेव्हा आम्ही अधिक हुशारीने फलंदाजी केली. मला आणखी एका षटकाची अपेक्षा होती. फलंदाजीसाठी विकेट चांगली होती. मात्र, २५-३० षटकांनंतर चेंडू निश्चितपणे थांबत होता.”
शुभमन गिलने सलामीवीर म्हणून मिळालेल्या संधीचा फायदा उठवला.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेत रोहित शर्माच्या अनुपस्थितीत शुभमन गिलला शिखर धवनसोबत डावाची सलामी देण्याची संधी मिळाली. त्याने ते हाताबाहेर जाऊ दिले नाही आणि संपूर्ण मालिकेत सर्वाधिक धावा करणारा तो खेळाडू ठरला. शुभमन गिलने ३ सामन्यात १०२.५० च्या सरासरीने २०५ धावा केल्या. त्याने दोन अर्धशतके ठोकली. तिन्ही सामन्यांमध्ये शुभमन गिलने भारताला चांगली सुरुवात करून दिली. पहिल्या सामन्यात शुभमनने शिखर धवनसह पहिल्या विकेटसाठी ११९ धावा, दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ४८ आणि तिसऱ्या सामन्यात ११३ धावा जोडल्या. त्यामुळे भारतीय संघाला तिन्ही सामन्यांमध्ये मोठी धावसंख्या करता आली.
या कामगिरीचे बक्षीस शुभमन गिललाही मिळाले. तिसर्या एकदिवसीय सामन्यात नाबाद ९८ धावा केल्याबद्दल त्याला सामनावीरासह मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून गौरवण्यात आले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
हिप हिप हुर्रे..! वनडे मालिकेत भारताचा वेस्ट इंडिजला क्लीन स्वीप; गिल मालिकावीर
‘तो परत आलाय’! सहा वर्षानंतर ‘हा’ टी२० स्पेशालिस्ट दक्षिण आफ्रिका संघात; गाजवलेला २०१५ वर्ल्डकप
धवनची ‘गब्बर’ कामगिरी, वेस्ट इंडिजविरुद्ध अर्धशतक झळकावत रोहित, सेहवागवर ठरला वरचढ