प्रत्येक खेळाडूसाठी त्याच्या कारकिर्दीतील पहिले कसोटी शतक नेहमीच खास असते. असेच काहीसे भारताचा सलामीवीर शुबमन गिलच्या बाबतील घडले आहे. त्याने त्याच्या कसोटी कारकिर्दीतील पहिले शतक बांगलादेशविरुद्ध शुक्रवारी (16 डिसेंबर) झळकावले. या सामन्याचा तिसरा दिवस संपला असता भारताने दुसरा डाव 2 विकेट्स गमावत 258 धावसंख्येवर घोषित केला. त्यानंतर गिलने शतकाबाबत आपले विचार व्यक्त केले आहेत.
चट्टोग्राम येथे बांगलादेश विरुद्ध भारत (BANvIND) यांच्यात मालिकेतील पहिला कसोटी सामना 14 डिसेंबरपासून खेळला जात आहे. शुबमन गिल (Shubman Gill) याच्या कारकिर्दीतील हा 12वा कसोटी सामना होता. ज्यामध्ये त्याने भारताच्या दुसऱ्या डावात 110 धावा केल्या. ही खेळी करूनसुद्धा तो काहीसा निराश होता. तो सामन्यानंतर सोनी लिव्ह चॅनलवर बोलत होता. त्यामध्ये तो म्हणाला, “मलाही वाटते पहिले शतक करण्यास खूप वेळ लागला. हे शतक माझ्या कुटुंबासाठी, मित्रांसाठी आणि चाहत्यांसाठी खूप विशेष आहे, कारण त्यांनी नेहमीच माझे समर्थन केले आहे.”
गिलने त्याच्या धमाकेदार खेळीत 10 चौकार आणि 3 षटकार खेचले. यावेळी त्याला 90 पर्यंत पोहोचला तेव्हा चिंता होती का, असे विचारले गेले. त्यावर तो म्हणाला, “काही वेगळे वाटले नाही. मी केवळ क्षेत्ररक्षकांनुसार खेळत होतो. त्यामुळे धावा करण्यात यशस्वी झालो. सीमारेषेपार चेंडू पाठवत शतक पूर्ण करणे नेहमीच खास असते. मात्र जेव्हा गोलंदाज ‘राउंड द विकेट’ चेंडू टाकतो तेव्हा थर्ड मॅन आणि पाईंटवर जागा रिकामी असते आणि या जागेवर मी माझ्या या संपूर्ण खेळीमध्ये खेळलो नाही.” हे बोलताना त्याच्या चेहऱ्यावर नाराजी दिसली.
गिलने त्याचे आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिले शतक याच वर्षीच्या ऑगस्ट महिन्यात झिम्बाब्वे विरुद्ध केले. त्या वनडे सामन्यात त्याने 130 धावा केल्या होत्या. तसेच त्याने कसोटीत शतक करण्याआधी ऑस्ट्रेलियाविरुद्ध मागील वर्षी ब्रिसबेनमध्ये 91 धावांची खेळी केली होती. जी त्यावेळी त्याची कसोटीतील सर्वोच्च खेळी होती.
या सामन्यात भारत केएल राहुल याच्या नेतृत्वाखाली खेळत आहे. ज्यामध्ये भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करताना 404 धावांचा डोंगर उभारला. त्यानंतर बांगलादेशच्या पहिल्या डावात कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज या जोडीने 8 विकेट्स घेतल्या. ज्यामुळे यजमानांचा पहिला डाव 150 धावसंख्येवरच संपुष्टात आला. Shubman Gill called the maiden Test century special, but was upset about one thing BANvIND First Test
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
FIFA WC 2022: अर्जेंटिनाशी भिडण्यापूर्वीच फ्रांसला मोठा धक्का, अनेक स्टार खेळाडू व्हायरसच्या विळख्यात
BANvIND Test: पाच विकेट्स घेतल्यानंतर कुलदीप यादव झाला भावूक! म्हणाला, ‘दोन वर्ष झाली…’