भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात बाॅर्डर गावस्कर मालिका अंतर्गत पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. सध्या या मालिकेतील तिसरा सामना खेळवला जात आहे. ज्यामध्ये टीम इंडिया खूप कठीण परिस्थितीत असल्याचं दिसत आहे. या सामन्याच्या तिसऱ्या दिवसअखेर टीम इंडियाने 17 षटकांत 51 धावा केल्या होत्या. मात्र संघाच्या चार विकेट पडल्या होत्या. या सामन्यात टीम इंडियाची सुरुवात खूपच खराब झाली होती. यशस्वी जयस्वाल 4 धावा करून बाद झाला, पण त्याच्या पाठोपाठ आलेल्या शुबमन गिललाही फार काही करता आले नाही. तो 1 धाव करून पॅव्हेलियनमध्ये परतला. कोहली 4 धावा करून तर रिषभ पंत 9 धावा करून बाद झाला. त्यापैकी टीम इंडियाचा एक फलंदाज असा आहे जो आशियाबाहेर सतत अपयशी ठरत आहे. हा फलंदाज दुसरा कोणी नसून शुबमन गिल आहे.
टीम इंडियाचा स्टार युवा फलंदाज शुबमन गिल काही विशेष करू शकलेला नाही. या मालिकेदरम्यान चाहत्यांना गिलकडून खूप अपेक्षा होत्या. मात्र आतापर्यंत संपूर्ण मालिकेत गिल फ्लॉप ठरला आहे. त्याने शेवटची 91 धावांची खेळी 2021 मध्ये गाबा येथे खेळली होती. तेव्हापासून तो सतत फ्लॉप ठरत आहे. त्यानंतर तो आशियाबाहेर एका डावात 40 धावांचा टप्पा पार करू शकला नाही. ज्यात त्याची सर्वोच्च धावसंख्या 36 आहे. गिलचा असा खराब फॉर्म टीम इंडियासाठी चिंतेचा विषय आहे. त्याला या कमकुवतपणावर लवकरात लवकर काम करण्याची गरज आहे.
गिलने आशियाबाहेर गेल्या 16 डावांत केवळ 267 धावा केल्या आहेत. त्याने आतापर्यंत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दोन सामन्यांच्या तीन डावात 60 धावा केल्या आहेत. ज्यात त्याची सर्वोच्च धावसंख्या 31 होती. टीम इंडियाला या मालिकेत चांगली कामगिरी करायची असेल, तर शुबमन गिलचे फॉर्ममध्ये असणे खूप महत्त्वाचे आहे. आणि आणखी काही दिवस तो असाच फ्लॉप होत राहिला तर त्याचे कसोटी संघातील स्थानही धोक्यात येईल. भारतीय संघाला पुढील दोन कसोटी सामने मेलबर्न आणि सिडनी येथे खेळायचे आहेत. या दोन्ही ठिकाणी खराब फॉर्मसह फलंदाजी करणे गिलसाठी सोपे नसेल.
हेही वाचा-
गाबा कसोटीच्या चौथ्या दिवशी संघाला मोठा धक्का, स्टार गोलंदाज रुग्णालयात दाखल
SMAT 2024; जेतेपद जिंकणाऱ्या मुंबई संघाला मिळणार इतकी बक्षीस रक्कम
कसोटी फाॅरमॅटमध्ये वेस्ट इंडिजला मिळणार नवा मुख्य प्रशिक्षक..! बोर्डाने केली घोषणा