भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या दुसर्या कसोटी सामन्यातील दुसरा दिवस भारताचा प्रभारी कर्णधार अजिंक्य रहाणेने गाजवला. रहाणेने २०० चेंडूत १०४ धावांची नाबाद खेळी केली. त्याच्या या अप्रतिम शतकामुळे दुसर्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने ८२ धावांची महत्त्वपूर्ण आघाडी घेतली.
त्याच्या खेळीने या सामन्यातील पदार्पणवीर शुबमन गिल चांगलाच प्रभावित झाला होता. आजच्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर आभासी पत्रकार परिषदेत बोलताना गिलाने आपल्या कर्णधाराचे भरभरून कौतुक केले.
संयमी खेळीचा उत्तम नमुना
रहाणेच्या आजच्या शतकाबद्दल बोलताना शुबमन म्हणाला, “त्याची आजची खेळी अतिशय धीरोदात्त होती. या खेळीत संयम अतिशय महत्त्वाचा होता. विशेषतः तुम्ही जेव्हा जागतिक दर्जाच्या गोलंदाजी आक्रमणाविरुद्ध फलंदाजी करत असता, त्यावेळी तुम्ही कोशात जाण्याची शक्यता असते. आणि मग त्यामुळे धावा काढणे अधिकच कठीण होऊन जाते. पण रहाणेने ते अतिशय खुबीने टाळले. ज्या पद्धतीने रहाणे खेळला, ते बघणे अतिशय सुखावह होते. त्याच्या फलंदाजीतून बरेच काही शिकायला देखील मिळाले. ज्या पद्धतीने चांगले स्पेल तो खेळून काढत होता, आणि खराब चेंडूंचा समाचार घेत होता, ते अनुकरणीय आहे”, असे गिल म्हणाला.
आपल्या पदार्पणाच्या सामन्यात ६५ चेंडूत ४५ धावा काढणारा शुबमन खेळपट्टीबाबत बोलताना म्हणाला, “मी फलंदाजी करत असताना खेळपट्टी गोलंदाजांना अनुकूल होती. मात्र मी आहे त्या परिस्थितीचा आत्मविश्वासाने सामना करायचे ठरवले होते. खेळपट्टीबद्दल बोलायचे झाल्यास पहिल्याच दिवशी आर अश्विन आणि रवींद्र जडेजाचा चेंडू वळत होता, दुसर्या दिवशीही नॅथन लॉयनचा चेंडू वळाला. त्यामुळे माझ्यामते खेळपट्टीला अधिकच भेगा पडत जातील आणि फलंदाजी करणे अधिकच कठीण होत जाईल. त्यामुळे आम्ही पहिल्या डावातील आघाडी अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न करू.”
रहाणेच्या शतकाने भारताचे वर्चस्व
दुसर्या दिवसाच्या खेळाची भारताने १ बाद ३६ धावांवर सुरुवात केली तेव्हा मोठी धावसंख्या उभारत पहिल्या डावात आघाडी घेण्याचा भारतीय संघाचा इरादा होता. मात्र पहिल्याच सत्रात चेतेश्वर पुजारा आणि शुबमन गिल बाद झाल्याने या इराद्यावर पाणी फेरले जाण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र अजिंक्य रहाणेने एका बाजूने नेटाने किल्ला लढवत झुंजार शतक साकारले. त्याला रवींद्र जडेजाने नाबाद ४० धावा करत सुरेख साथ दिली. यामुळे भारतीय संघाकडे एकूण ८२ धावांची आघाडी असून तिसर्या दिवशी ही आघाडी अजून वाढविण्याचा भारतीय संघ प्रयत्न करेल.
महत्वाच्या बातम्या:
– IND vs AUS : रहाणे-जडेजाच्या शतकी भागीदारीच्या जोरावर दुसऱ्या दिवसाखेर भारतीय संघ ८२ धावांनी आघाडीवर
– आयसीसीच्या दशकातील सर्वोत्तम कसोटी संघाचा कोहलीच किंग; या भारतीय फिरकीपटूलाही मिळाले स्थान
– NZ vs PAK : पहिल्या डावात न्यूझीलंडचा ४३१ धावांचा डोंगर, प्रत्युत्तरात पाकिस्तानची अडखळती सुरुवात