भारतीय संघ सध्या न्यूझीलंडविरूद्ध टी20 मालिका खेळत आहे. वनडे मालिकेनंतर आता 21 जानेवारीपासून टी20 मालिकेला सुरूवात होणार आहे, जी टी20 विश्वचषक 2026 च्या दृष्टीने महत्त्वाची असेल. भारताचा कसोटी व वनडे कर्णधार शुबमन गिल वर्ल्डकप संघाचा भाग नसणार आहे. पण यादरम्यान त्याने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप व 2027 च्या विश्वचषकासाठी संघाकरता एक खास प्लॅन तयार केला आहे आणि बीसीसीआयसमोर देखील हा प्लॅन ठेवला आहे.
शुबमन गिलच्या नेतृत्त्वाखाली वनडे मालिका गमावल्यानंतर टी20 संघाचा भाग नसलेले खेळाडू माघारी परतले आहेत. शुबमन गिल रणजी ट्रॉफी स्पर्धेतील पुढील सामने खेळण्यासाठी पंजाब संघात दाखल झाला असून संघाचं नेतृत्त्व देखील करताना दिसेल. गिलच्या नेतृत्त्वाखाली भारताने अद्याप एकही वनडे किंवा कसोटी मालिका जिंकलेली नाही.
भारतीय क्रिकेट संघाला वनडे आणि कसोटी फॉरमॅटमध्ये अधिक बळकट करण्यासाठी शुबमन गिलने महत्त्वपूर्ण सूचना दिल्या आहेत. भारताचा कसोटी आणि एकदिवसीय कर्णधार शुबमन गिलच्या मते, नियमित कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंनी रणजी ट्रॉफीमध्ये किमान एक सामना खेळला पाहिजे. गिलच्या मते, यामुळे खेळाडूंना रेड-बॉल क्रिकेटचा सराव करण्यासाठी अधिक संधी मिळेल. विशेषतः आयपीएलपूर्वी, कारण टीम इंडिया ऑगस्टपर्यंत कोणताही कसोटी सामने खेळणार नाही.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, गिलने प्रशिक्षक गौतम गंभीर आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांच्याशी या विषयावर चर्चा केली आहे. खेळाडूंनी बराच काळ कसोटी क्रिकेटपासून दूर राहू नये, म्हणून व्यवस्थापनानेही या कल्पनेला पाठिंबा दर्शविला आहे. अलिकडेच, भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका 0-2 अशी गमावली, ज्याचे एक प्रमुख कारण फॉरमॅटमध्ये बदल झाल्यानंतर तयारीसाठी कमी वेळ असल्याचं म्हटलं गेलं होतं.
शुबमन गिल म्हणाला होता की, विदेश दौऱ्यावरून परतल्यानंतर लगेच भारतात सामने खेळणं कठीण असतं. त्याने सांगितलं की, 2016-2018 च्या आसपासचे वेळापत्रक इतके व्यस्त नव्हते. जिथे खेळाडूंना दर चौथ्या दिवशी सामना खेळावा लागेल. खेळाडूंना विश्रांती आणि तयारीसाठी वेळ देण्यासाठी कॅलेंडरमध्ये काही लवचिकता असावी, जसं की 10-12 दिवसांचे अंतर, असं त्याने म्हटलं होतं.
शुबमन गिल 2027 च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या तयारीवरही लक्ष केंद्रित करत आहे. तो भविष्यातील रणनिती आखण्यासाठी संघ व्यवस्थापनाबरोबर काम करत आहे. गिल हा कसोटी आणि एकदिवसीय संघांचा कर्णधार आहे, परंतु 2026 च्या टी20 विश्वचषक संघात त्याचा समावेश नाही. न्यूझीलंडविरुद्धच्या अलिकडच्या एकदिवसीय मालिकेनंतरही त्याने विश्रांती घेतलेली नाही, त्याने रणजी ट्रॉफीमध्ये पंजाबकडून खेळण्याचा निर्णय घेतला आहे.






