येत्या सप्टेंबर महिन्यात न्यूझीलंड अ संघ भारत अ संघाचा दौरा करणार आहे. या दौऱ्यात उभय संघात ३ चार दिवसीय आणि ३ एकदिवसीय सामने खेळले जाणार आहेत. हे सामने भारतातील बेंगलोर आणि चेन्नई शहरात होतील. या सामन्यांसाठी भारत अ संघाचे नेतृत्त्वपद धाकड सलामीवीर शुबमन गिल याला देण्यात येणार असल्याचे समजत आहे. तसेच मुंबईचा प्रतिभाशाली अष्टपैलू शम्स मुलानी याचीही या सामन्यांसाठी निवड होण्याची शक्यता आहे.
भारत अ विरुद्ध न्यूझीलंड अ (India A vs New Zealand A) संघात बेंगलोर येथे अनुक्रमे १-४ सप्टेंबर, ८-११ सप्टेंबर आणि १५-१८ सप्टेंबरला ३ चार दिवसीय सामने खेळले जातील. त्यानंतर चेन्नईत २२ सप्टेंबरपासून ३ एकदिवसीय सामन्यांना सुरुवात होईल. अनुक्रमे २२ सप्टेंबर, २५ सप्टेंबर आणि २७ सप्टेंबर रोजी हे सामने खेळवले जातील.
या सामन्यांसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) २२ वर्षीय शुबमनला कर्णधारपदी नियुक्त करण्याची योजना आखत आहे. शुबमन गेल्या काही वर्षांत भारतीय संघाचा प्रमुख सदस्य बनला आहे. तो सध्या भारताच्या झिम्बाब्वे दौऱ्यात सलामीवीराची भूमिका बजावत असून त्याने दमदार प्रदर्शनही केले आहे. झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात त्याने ७२ चेंडूत नाबाद ८२ धावा केल्या होत्या. या खेळीसाठी त्याने १ षटकार आणि १० चौकारही मारले होते.
शुबमनबरोबरच मराठमोळ्या शम्स मुलानी यालाही त्याच्या परिश्रमांचे फळ मिळू शकते. त्याने मुंबई संघाकडून वरिष्ठ आणि २५ वर्षांखालील स्तरावर उल्लेखनीय प्रदर्शन केले आहे. तो रणजी ट्रॉफीच्या मागील हंगामात ६ सामन्यात तब्बल ४५ विकेट्स घेत हंगामात सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज राहिला आहे. तसेच २५ वर्षांखालील सीके नायुडू ट्रॉफीमध्येही त्याने मुंबईकडून ३ सामने खेळताना तब्बल २९ विकेट्स घेतल्या आहेत.
याबरोबरच ४ दिवसीय सामन्यांसाठी मध्य प्रदेशच्या रजत पाटीदारची निवड होऊ शकते. त्याने यावर्षीच्या रणजी ट्रॉफी हंगामात दमदार प्रदर्शन केले होते. मध्य प्रदेश संघाला रणजी ट्रॉफी जिंकून देण्यासाठी अंतिम सामन्यात त्याने केलेल्या १२२ आणि नाबाद ३० धावा निवडकर्त्यांना प्रभावित करण्यासाठी पुरेशा ठरल्या. तो आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा भाग आहे. तसेच शार्दुल ठाकूर, सरफराज खान आणि यशस्वी जयस्वाल हे चेहरेही भारत अ संघाचा भाग असतील.
दुखापतीमुळे भारताच्या झिम्बाब्वे दौऱ्यातून बाहेर झालेला वॉशिंग्टन सुंदरही न्यूझीलंडविरुद्ध निवडला जाऊ शकतो. तर पृथ्वी शॉला एकदिवसीय सामन्यासाठी निवडले जाण्याची शक्यता आहे.
चार दिवसीय सामन्यासाठी संभाव्य भारत अ संघ:
शुबमन गिल (कर्णधार), यश दुबे, हनुमा विहारी, रजत पाटीदार, सरफराज खान, वॉशिंग्टन सुंदर, केएस भरत (यष्टीरक्षक), शम्स मुलानी, जलज सक्सेना, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, यशस्वी जयस्वाल, शुभम शर्मा, अक्षय वाडकर (यष्टीरक्षक), शाहबाज अहमद, मणिशंकर मुरासिंग
एकदिवसीय सामन्यासाठी संभाव्य भारत अ संघ:
शुभमन गिल (कर्णधार), पृथ्वी शॉ, ऋतुराज गायकवाड, हनुमा विहारी, इशान किशन (यष्टीरक्षक), ऋषी धवन, वॉशिंग्टन सुंदर, प्रवीण दुबे, मयंक मार्कंडे, प्रसीध कृष्णा, मोहम्मद सिराज, केएस भरत (यष्टीरक्षक), व्यंकटेश अय्यर, पुलकित नारंग, राहुल चहर आणि यश दयाल