विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याला खऱ्या अर्थाने शनिवार (२० जून) रोजी सुरुवात झाली. भारतीय संघाला फलंदाजी करताना न्यूझीलंडच्या गोलंदाजाव्यतिरिक्त ढगाळ वातावरण आणि अंधुक प्रकाशाचा सामना करावा लागला. शनिवारच्या शेवटच्या सत्रात भारतीय संघाचे कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणे अतिशय वैतागले. प्रत्येक पाच एक षटकांनंतर सामना थांबवण्यात येत होता.
तसेच भारतीय संघाला रविवारच्या दिवशी गोलंदाजीच्या वेळीसुद्धा शेवटच्या सत्रात विकेट्सची गरज असताना अंधुक प्रकाशामुळे सामना थांबण्यात आला. यावर आता युवा सलामीवीर शुबमन गिल याने प्रतिक्रिया दिली आहे.
भारतीय संघाचा युवा सलामीवीर शुबमन गिलला वाटते की, अंधुक प्रकाशाने भारतीय संघाला नुकसान झाले आहे. तिसऱ्या दिवशी शेवटच्या सत्रात अजून काही षटक फेकले गेले असते तर न्यूझीलंडच्या रॉस टेलरची विकेट घेण्यात भारतीय संघाचे गोलंदाज यशस्वी झाले असते, असे त्याचे म्हणणे आहे. तिसऱ्या दिवशीचा खेळ संपल्यावर गिलने पत्रकार परिषदेत सागितले की, “कॉनवेची विकेट आमच्यासाठी महत्वपूर्ण होती. तसेच अजून काही षटके टाकण्यास मिळाली असती तर, रॉस टेलरची विकेटसुद्धा मिळाली असती.”
“उद्या (सोमवारी २१ जून) आम्ही आघाडीवर असू. कारण, न्यूझीलंडचे दोन्ही सलामी फलंदाज, जे मैदानावर थोडा वेळ स्थिरावले होते ते बाद झाले आहेत. आता खेळणारे फलंदाज अर्थात विलियम्सन आणि टेलर हे नुकतेच फलंदाजीसाठी आले आहेत. त्यामुळे त्यांना या मैदानावर स्थिरावण्यासाठी थोडा वेळ लागेल आणि आम्ही त्याच गोष्टीचा फायदा घेऊ,” असे त्याने पुढे सांगितले.
गिल संघाच्या फलंदाजीविषयी म्हणाला की, “सुरुवातीला आम्ही मजबूत स्थितीत होतो. परंतु, पुढे आमच्या एका मागोमाग एक विकेट पडत गेल्या. परंतु दुसऱ्या डावात आम्ही नक्कीच २५० धावाच्या पुढे धावा करण्याचा प्रयत्न करू.”
महत्त्वाच्या बातम्या-
पुणे-मुंबईचं नसेल असं ‘या’ शहराचं गेल्या ४ दिवसांत भारतीयांनी गुगलवर सर्च केलंय हवामान
‘मूड स्विंग झाला, पण चेंडू नाही’; टिम इंडियाच्या सुमार गोलंदाजीवर माजी क्रिकेटर नाराज
‘त्याच्या खराब शॉटची चर्चा करणे अयोग्य,’ इंग्लंडच्या माजी खेळाडूने घेतली पंतची बाजू