झिम्बाब्वेच्या संघानं गांबियाविरुद्धच्या टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम केला. झिम्बाब्वेनं 20 षटकात तब्बल 344 धावा ठोकल्या. या सामन्यात झिम्बाब्वेचा कर्णधार सिकंदर रझा यानं अवघ्या 33 चेंडूत शतक झळकावून रोहित शर्माचा विक्रम मोडला. कसोटी खेळणाऱ्या देशाच्या खेळाडूद्वारे ठोकलेलं हे सर्वात जलद शतक आहे. सिकंदर रझानं 43 चेंडूत नाबाद 133 धावांची खेळी केली. त्यानं आपल्या खेळीत 7 चौकार आणि 15 षटकार मारले. यापूर्वी रोहित शर्मा आणि दक्षिण आफ्रिकेच्या डेव्हिड मिलरनं 35 चेंडूत शतक ठोकण्याचा पराक्रम केला होता.
सिकंदर रझा याची कथा कोणत्याही बॉलिवूड चित्रपटापेक्षा कमी नाही. त्याचा जन्म पाकिस्तानात झाला होता, परंतु त्यानं स्कॉटलंडमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं. सिकंदर रझाचं प्राथमिक शिक्षण पाकिस्तान एअरफोर्स पब्लिक स्कूलमध्ये झालं होतं. त्याला पायलट व्हायचं होतं, परंतु तो दृष्टी चाचणी पास होऊ शकला नाही.
सिकंदर रझा याचं कुटुंब 2002 मध्ये झिम्बाब्वेला गेलं. परंतु तो अभ्यासासाठी स्कॉटलंडला गेला. त्यानं स्कॉटलंडच्या ग्लासगो कॅलेडोनियन विद्यापीठातून सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगची पदवी घेतली. यासोबत तो क्रिकेट देखील खेळत राहिला. रझा 2011 च्या विश्वचषकासाठी झिम्बाब्वेच्या संभाव्य संघात निवडला गेला होत. परंतु त्याला अंतिम 15 खेळाडूंमध्ये स्थान मिळालं नाही.
कालांतरानं सिकंदर रझानं झिम्बाब्वेसाठी 2013 मध्ये तिन्ही फॉरमॅटमध्ये पदार्पण केलं. सध्या तो झिम्बाब्वे टी20 संघाचा कर्णधार आहे. त्यानं आतापर्यंत 17 कसोटी सामन्यांव्यतिरिक्त 142 एकदिवसीय आणि 95 टी20 सामन्यांमध्ये झिम्बाब्वेचं प्रतिनिधित्व केलं आहे. याशिवाय तो आयपीएलमध्ये पंजाब किंग्जचा भाग होता. आयपीएलच्या गेल्या हंगामात रझानं 2 सामन्यात 43 धावा केल्या होत्या.
हेही वाचा –
टीम इंडियाला मोठा धक्का, न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यातून कर्णधार बाहेर
SA VS BAN; विजयानंतर दक्षिण आफ्रिकेने WTC मध्ये घेतली मोठी झेप, टीम इंडियाचे टेन्शन वाढले?
रबाडानं जागतिक क्रिकेटमध्ये झेंडा फडकावला! मोर्ने मॉर्केलला मागे टाकत केला मोठा पराक्रम