टीम इंडियाची (Team india) सीनियर टीम लॉर्ड्सच्या मैदानावर इंग्लंडचा सामना करत आहे. दुसरीकडे, भारताची युवा टीम देखील इंग्लंडविरुद्ध यूथ कसोटी मालिका खेळत आहे. दोन यूथ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना बर्मिंघम येथे सुरू आहे. या मालिकेत भारताच्या युवा संघाची कर्णधारपदाची धुरा आयुष म्हात्रेच्या (Aayush Mhatre) खांद्यावर आहे. वनडे मालिकेत भारतीय संघाने आधीच विजय मिळवला आहे आणि आता कसोटीमध्येही पहिल्या दिवशी चांगली फलंदाजी केली आहे. वनडे मालिकेत अपयशी ठरल्यानंतर आयुष म्हात्रेने कसोटी मालिकेमध्ये दमदार सुरुवात केली आहे.
यूथ कसोटी मालिकेच्या पहिल्या सामन्यात आयुष म्हात्रेने उत्तम फलंदाजी करत शतक ठोकले. त्याने 115 चेंडू खेळत 102 धावांची शानदार खेळी केली. या डावात तो उत्तम फॉर्ममध्ये दिसला. त्याच्या शतकात 14 चौकार आणि 2 षटकार सामील होते. याआधी वनडे मालिकेत मात्र तो फार अपयशी ठरला होता. इंग्लंडविरुद्ध यूथ वनडेच्या 4 डावात त्याने फक्त 27 धावा केल्या होत्या.
वनडे मालिकेत भारताकडून वैभव सूर्यवंशीने (Vaibhav Suryavanshi) चांगली कामगिरी केली. त्याने मालिकेत सर्वाधिक धावा केल्या. पण जेव्हा रेड बॉल कसोटी क्रिकेटची वेळ आली, तेव्हा पहिल्याच डावात तो अपयशी ठरला. त्याने सलग 3 चेंडूंवर 3 चौकार मारले आणि लगेच तो बाद झाला. त्याने एकूण 13 चेंडू खेळत 14 धावा केल्या.
तसेच तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीस उतरलेल्या विहान मल्होत्राने 99 चेंडूत 67 धावा केल्या. त्याच्या खेळीमुळे भारताने पहिल्या डावात 4 खेळाडू गमावून 217 धावा केल्या आहेत.






