भारतीय संघाला विश्वचषक 2023 अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाकडून 6 विकेट्सने पराभूत व्हावे लागले. यामुळे ऑस्ट्रेलिया 6 व्यांदा विश्वचषक विजेता बनला. या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. या निर्णयावर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले होते. आता याच निर्णयाबाबत ऑस्ट्रेलियाला पहिला वनडे विश्वचषक जिंकून दिलेल्या सर ऍलन बॉर्डर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अहमदाबाद येथील खेळपट्टीचा विचार केल्यास नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम फलंदाजीचा निर्णय घेईल असे सर्व समीक्षक सांगत होते. मात्र, कमिन्स याने गोलंदाजीचा निर्णय घेतल्याने अनेकांनी तोंडात बोटे घातली. याचबाबत बॉर्डर यांना विचारले असता तो म्हणाले,
“नक्कीच या निर्णयाचे अनेकांना आश्चर्य वाटले होते. मला विचाराल तर कमिन्सने नाणेफेक जिंकून घेतलेला गोलंदाजीचा निर्णय हा मी पाहिलेला आजवरचा सर्वात धाडसी निर्णय होता.”
बॉर्डर यांच्याच नेतृत्वात ऑस्ट्रेलियाने 1987 मध्ये पहिल्यांदा वनडे विश्वचषकावर नाव कोरले होते. दुसरीकडे कमिन्स याच्या नेतृत्वातील ऑस्ट्रेलियाचे हे दुसरे आयसीसी विजेतेपद आहे. यापूर्वी जून महिन्यात खेळल्या गेलेल्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यातही त्यांनी भारताचाच पराभव केला होता.
या सामन्यात भारतीय संघाने विराट कोहली व केएल राहुल यांच्या अर्धशतकांमुळे 241 धावा उभ्या केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने 43 षटकातच सामना संपवला. भारतीय गोलंदाजांनी फक्त 47 धावांवर ऑस्ट्रेलियाच्या 3 विकेट्स घेतल्या होत्या. मात्र, त्यानंतर ट्रेविस हेड याने 137 धावांची शतकी खेळी व त्याला मार्नस लॅब्युशेन याने नाबाद अर्धशतक करून साथ दिल्याने ऑस्ट्रेलियाने सहा गडी राखून विजय मिळवला.
(Sir Allan Border Said Pat Cummins Bowling Decison Is Bravest Ever)
महत्वाच्या बातम्या –
पराभवानंतर भारतीय गोलंदाजाच्या घराला पोलीस सुरक्षा, चिडलेल्या चाहत्यांमुळे आधीच घेतली खबरदारी
आयसीसीचा श्रीलंकन क्रिकेट बोर्डाला तात्पुरता दिलासा, खेळण्याची दिली परवानगी पण…