आयपीएल २०२० स्पर्धा युएईमध्ये खेळवली जात आहे. दरवर्षी आयपीएल स्पर्धा भारतात आयोजित केली जाते, परंतु कोरोना महामारीमुळे ही स्पर्धा यंदा यूएईमध्ये खेळली जात आहे. यूएईच्या मैदानांवर आयोजित केलेल्या आयपीएल स्पर्धेत अनेक खेळाडूंनी जबरदस्त कामगिरी केली आहे. दरम्यान, भारतातील काही युवा क्रिकेटपटूंनीही चमकदार कामगिरी करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याची उत्कृष्ट कामगिरी पाहून क्रिकेट तज्ज्ञ आणि क्रिकेट चाहत्यांनी त्यांना भारताचे भविष्य असल्याचा दावा केला. आपण त्या ६ युवा भारतीय क्रिकेटपटूंबद्दल जाणून घेऊया ज्यांनी यंदाच्या आयपीएलमध्ये अद्भुत कामगिरी करत सर्वांना प्रभावित केले आहे.
६. अब्दुल समद – सनरायझर्स हैदराबाद
जम्मू-काश्मीरचा १९ वर्षीय स्टार अष्टपैलू अब्दुल समदने यावर्षी आयपीएलमध्ये शानदार प्रदर्शन करून क्रिकेट चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले. अब्दुल समदला सनरायझर्स हैदराबादचा गोलंदाजी प्रशिक्षक मुथय्या मुरलीधरनने संघात स्थान दिले होते.
संघात सामील झाल्यानंतर अब्दुल समदने सनरायझर्स हैदराबाद संघ व्यवस्थापनाला निराश केले नाही, त्याने फलंदाजीच्या माध्यमातून संघासाठी चांगली कामगिरी केली, तर गोलंदाजीमध्ये त्याने स्वत: ला एक उत्तम गोलंदाज असल्याचेही सिद्ध केले. अब्दुल समदची सातत्यपूर्ण कामगिरी झाल्यास तो भारताचा भावी स्टार असल्याचे दिसते.
त्याने आयपीएलमध्ये या हंगामातून पदार्पण करत ३ सामन्यात खेळताना फलंदाजीत खालच्या फळीत फलंदाजीला येत ४० धावा केल्या, तर गोलंदाजीत १ बळी देखील मिळवला आहे.
५. प्रियम गर्ग – सनरायझर्स हैदराबाद
भारतीय १९ वर्षाखालील संघाचा कर्णधार प्रियम गर्गने आयपीएलमध्ये संधी मिळाल्यावर लगेचच आपली क्षमता सिद्ध केली. चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचे चार फलंदाज लवकर पॅव्हिलियनमध्ये परतले तेव्हा संघाच्या आशा प्रियम गर्गवर होती.
प्रियम गर्गने या सामन्यात संघाच्या अपेक्षांची पूर्तता केली आणि हैदराबादचा युवा क्रिकेटर अभिषेक शर्मा सोबत मिळून संघाला सन्माननीय १६४ धावांपर्यंत नेले. प्रियाम गर्गने या सामन्यात २६ चेंडूत नाबाद ५१ धावा केल्या. प्रियम गर्गने आपल्या पदार्पणातच अर्धशतक झळकावून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्याने आतापर्यंत आयपीएलमध्ये ५ सामने खेळले असून त्यात त्याने ७१ धावा केल्या आहेत.
४. रवी बिश्नोई – किंग्ज इलेव्हन पंजाब
१९ वर्षांखालील भारतीय संघाचा स्टार फिरकी गोलंदाज रवी बिश्नोईला आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळण्याची संधी मिळाली. पंजाबने रवी बिश्नोईला या हंगामाच्या सुरुवातीच्या सामान्यापासूनच संधी दिली आहे. आयपीएलमध्ये त्याने आत्तापर्यंत ५ सामने खेळले आहेत, त्यामध्ये त्याने चार फलंदाजांना बाद केले आहे.
रवी बिश्नोई सध्या किंग्ज इलेव्हन पंजाबचे प्रशिक्षक अनिल कुंबळेच्या मार्गदर्शनाखाली अनेक गोष्टी शिकत आहे. रवी बिश्नोईनेही जर अशीच कामगिरी करत राहिला तर तो भारतीय क्रिकेटचे भविष्य बनू शकेल.
३. कमलेश नगरकोटी – कोलकाता नाईट रायडर्स
कोलकाता नाइट रायडर्सचा स्टार वेगवान गोलंदाज कमलेश नगरकोटी सध्या सुरू असलेल्या आयपीएल हंगामात उत्तम कामगिरी करत आहे. तो २०१८ च्या दरम्यान कोलकाता नाईट रायडर्स संघात सामील झाला होता, परंतु दुखापतीमुळे मागील दोन मोसमात त्याला संघाचे प्रतिनिधित्व करता आले नाही.
पण, जेव्हा त्याला २०२० च्या आयपीएलमध्ये कोलकाताकडून गोलंदाजीची संधी मिळाली तेव्हा त्याने संघाच्या अपेक्षेप्रमाणेच कामगिरी केली आणि शानदार कामगिरी करून स्वत: ला एक विश्वसनीय गोलंदाज म्हणून सिद्ध केले. कमलेश नगरकोटीने आतापर्यंत ४ आयपीएल सामने खेळले आहेत ज्यात त्याने ३ फलंदाज बाद केले आहेत.
२. ईशान किशन – मुंबई इंडियन्स
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि स्टार यष्टीरक्षक एमएस धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर सध्या बीसीसीआय आणखी चांगल्या यष्टीरक्षकाच्या शोधात आहे. त्यातच आता मुंबई इंडियन्सचा स्टार क्रिकेटर ईशान किशनने नुकतीच आरसीबीविरुद्धची चमकदार कामगिरी केली. त्यामुळे त्याचे नावही भारतीय संघात यष्टिरक्षक म्हणून स्थान मिळविणाऱ्या खेळाडूंच्या शर्यतीत सामील झाले आहे.
आरसीबीविरूद्ध मुंबई संघ मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना ईशान किशनने जबरदस्त कामगिरी करत ९९ धावा केल्या. त्याचे शतक एका धावेने हुकले. परंतु त्याच्या या खेळीने त्याने सर्वांचे लक्ष वेधले. याबरोबरच भविष्यात भारतीय संघाध्ये प्रवेश करण्याची क्षमता असल्याचे त्याने सिद्ध केले.
१. देवदत्त पडिक्कल – रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
सध्या सुरू असलेल्या आयपीएल हंगामात सर्वाधिक कोणी प्रभावित केले असेल तर तो रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा स्टार युवा सलामीवीर देवदत्त पडिक्कल आहे. त्याची कामगिरी या हंगामातही जबरदस्त होताना दिसत आहे. आरसीबीकडून आयपीएलमध्ये पदार्पण करत देवदत्तने आतापर्यंतच्या ५ सामन्यात ३ अर्धशतक ठोकून स्वत: ला एक चांगला सलामीवीर म्हणून सिद्ध केले आहे.
देवदत्त आयपीएलमध्ये अशीच कामगिरी करत राहिल्यास डावखुरा सलामीवीर म्हणून भारतीय क्रिकेट संघात तो प्रवेश करू शकतो. सध्या चालू असलेल्या आयपीएल हंगामातील देवदत्तने एकूण ५ सामने खेळले आणि ३ अर्धशतकांसह १७८ धावा केल्या आहेत.