भारतीय संघाने पहिल्यांदाच रोहित शर्मा याच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाविरुद्ध जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा 2023चा अंतिम सामना खेळला. मात्र, भारताच्या हाती निराशाच आली. रोहितकडे 10 वर्षांनंतर भारताला आयसीसी ट्रॉफी जिंकून देण्याची संधी होती, पण तो या संधीचा फायदा दोन्ही हातांनी घेण्यात अपयशी ठरला. त्यामुळे सलग दुसऱ्यांदा डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यात पोहोचूनही भारतीय संघाला पराभवाचाच सामना करावा लागला. यापूर्वी भारताने विराट कोहली याच्या नेतृत्वाखाली डब्ल्यूटीसी अंतिम सामना गमावला होता. आता 209 धावांनी पराभव पत्करत भारताला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. या पराभवानंतर रोहितने मोठी प्रतिक्रिया दिली.
काय म्हणाला रोहित?
भारतीय संघाचा दारुण पराभव झाल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा (Captain Rohit Sharma) याने म्हटले की, या विजयाचे श्रेय ऑस्ट्रेलिया संघाला जाते. मात्र, विशेषत: ट्रेविस हेडने चांगली खेळी केली आणि त्यामुळेच सामन्यात अंतर निर्माण झाले.
रोहित म्हणाला की, “आम्ही नाणेफेक जिंकून चांगली सुरुवात केली आणि पहिल्या सत्रात चांगली गोलंदाजी केली. मात्र, त्यानंतर गोलंदाजांनी जरा निराश केले. तसेच, हेड आणि स्मिथने चांगली फलंदाजी केली. त्यांच्या फलंदाजीमुळे आम्ही सावध झालो आणि आम्हाला माहिती होते की, पुनरागमन करणे कठीण असते, परंतु आम्ही चांगले प्रदर्शन केले आणि शेवटपर्यंत लढलो. आमची फलंदाजी जरा ढासळली आणि फलंदाजीसाठी चांगल्या खेळपट्टीवर आम्ही यशस्वी होऊ शकलो नाहीत.”
अजिंक्य-शार्दुलचं कौतुक
रोहित शर्मा (Rohit Sharma) याने अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) आणि शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) यांचेही कौतुक केले. तो म्हणाला की, “त्यांनी चांगले संघर्ष केले. आमच्या दुसऱ्या डावात गोलंदाजांनी चांगले प्रदर्शन केले आणि पाचव्या दिवशी खेळपट्टी फलंदाजीसाठी चांगली वाटत होती. आम्ही मागील चार वर्षांमध्ये खूप मेहनत घेतली आणि प्रामाणिकपणे सलग दोन अंतिम सामने खेळणे आमच्यासाठी मोठी कामगिरी आहे. आम्ही मागील दोन वर्षात जे काही केले, त्याचे श्रेय तुम्ही घेऊ शकत नाहीत. संपूर्ण संघाने चांगला प्रयत्न केला. हे दुर्दैवी ठरले की, आम्ही पुढे जाऊ शकलो नाहीत आणि अंतिम सामना जिंकू शकलो नाहीत. मात्र, आम्ही आमची मान उंच ठेवू आणि संघर्ष करत राहू.”
रोहित शर्माची कामगिरी
रोहित शर्मा डब्ल्यूटीसी अंतिम (WTC Final) सामन्यात अपेक्षित कामगिरी करू शकला नाही. त्याने पहिल्या डावात 26 चेंडू खेळताना 2 चौकारांच्या मदतीने 15 धावांवर तंबूचा रस्ता धरला होता. त्यानंतर रोहितने पहिल्या डावाच्या तुलनेत दुसऱ्या डावात चांगली कामगिरी केली. त्याने 60 चेंडूत 1 षटकार आणि 7 चौकारांच्या मदतीने 43 धावा केल्या. (skipper rohit sharma after india defeat by australia wtc final 2023)
महत्वाच्या बातम्या-
WTC Final । आयसीसी ट्रॉफीचा वनवास कायम! ऑस्ट्रेलियाकडून रोहितसेनेचा मानहानीकारक पराभव
अनुष्काने ओव्हलवर येऊन केली चूक! विराटची विकेट पडताच अभिनेत्री जोरात ट्रोल