भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघात 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना गुरुवारी (दि. 27 जुलै) खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने माध्यमांशी संवाद साधला. यावेळी विराट कोहलीच्या फॉर्मविषयी प्रश्न विचारताच रोहित शर्माने सेडेतोड प्रत्युत्तर दिले. रोहित म्हणाला की, जगात चर्चा होत असतात, त्यामुळे आम्हाला फरक पडत नाही. चला तर, याविषयी सविस्तर जाणून घेऊयात…
मागील काही काळापासून परदेशातील सामन्यांमध्ये विराट कोहली (Virat Kohli) याची बॅट तळपताना दिसत नाहीये. विराटने अलीकडेच वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत शतक झळकावले होते. परदेशातील मैदानावरील विराटचे हे पाच वर्षांनंतर आलेले पहिले कसोटी शतक होते. ज्यावेळी रोहित शर्मा (Rohit Sharma) याला विचारले गेले की, विराटने मोठ्या खेळी न करणे हे भारतीय संघासाठी चिंतेची बाब आहे का? हा प्रश्न कर्णधार रोहितला पटला नाही.
काय म्हणाला रोहित?
प्रश्नाचे उत्तर देत रोहित म्हणाला की, “मी या प्रश्नाचे उत्तर यापूर्वी अनेकदा दिले आहे. या सर्व बाहेरच्या चर्चा आहेत की, कुणी किती जास्त धावा केल्या, किती जास्त विकेट्स घेतल्या. जे लोक अशाप्रकारच्या चर्चा करतात, त्यांना माहिती नसते की, संघात काय सुरू आहे. आमच्या आतमध्ये जे काही घडते, ते आतमध्येच राहते. आमच्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट जी आहे ती म्हणजे, संघासाठी मालिका जिंकणे किंवा संघासाठी सामना जिंकणे. कोण काय बोलत आहे, याचा आम्हाला फरक नाही पडत”
पुढे बोलताना रोहित म्हणाला की, “आमची प्राथमिकता आता तीन सामन्यांची वनडे मालिका आहे. आम्ही आता त्यावरच लक्ष देत आहोत. आतमधील गोष्टी आतच राहतात आणि आम्हाला या गोष्टी आतमध्येच ठेवायच्या आहेत. ही एक अशी गोष्ट आहे, जी मी अनेकदा बोललो आहे आणि भविष्यातही माझे हेच उत्तर असेल.”
विराट-रोहितकडे विक्रम रचण्याची संधी
विराट कोहली याच्याकडे वनडेत 13000 धावा करण्याची संधी आहे. त्याने वनडेत आतापर्यंत 12898 धावा केल्या आहेत. त्याला 13 हजार धावा करण्यासाठी फक्त 102 धावांची गरज आहे. तसेच, रोहित शर्मा याच्याकडेही वनडे क्रिकेटमध्ये 10000 धावा करण्याची संधी आहे. त्याने वनडेत आतापर्यंत 9825 धावा केल्या आहेत. अशात त्याला 10 हजार धावा करण्यासाठी फक्त 175 धावांची गरज आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
ASHES: अखेर पाचव्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने जिंकली नाणेफेक, इंग्लंडला फलंदाजीचे आमंत्रण
हे तर पाहिलंच पाहिजे! Vintage Rolls Royce चालवताना धोनी कॅमेऱ्यात कैद, रांचीतील व्हिडिओ जगभरात व्हायरल