श्रीलंका आणि बांग्लादेश यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला 2 जुलैपासून सुरुवात झाली असून पहिला सामना कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर खेळवण्यात आला. मात्र या सामन्यात एक अशी घटना घडली, जिच्यामुळे क्षणभर मैदानावर गोंधळाची स्थिती निर्माण झाली. बांग्लादेश संघाचा डाव सुरू असताना, म्हणजे तिसऱ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूनंतर, अचानक मैदानात एक सुमारे सात फूट लांब साप आढळला. कॅमेऱ्यांनी ही हालचाल टिपताच अंपायरांनी सामना तात्काळ थांबवला.
ग्राउंड स्टाफने अतिशय सतर्कता दाखवत त्वरित सापाला मैदानाबाहेर काढले आणि काही मिनिटांतच सामना पुन्हा सुरू झाला. सुदैवाने कोणालाही इजा झाली नाही, मात्र खेळाडूंमध्ये आणि प्रेक्षकांमध्ये क्षणभर घबराट पसरली होती. श्रीलंकेत यापूर्वीही अशा प्रकारच्या घटना घडल्या असून पावसाळ्याच्या दिवसांत मैदानात सापांचे आढळणे नवीन नाही.
#snake #Cricket pic.twitter.com/Y5KMfE94aZ
— ABHISHEK PANDEY (@anupandey29) July 3, 2025
सामन्याच्या निकालाबद्दल बोलायचे झाले, तर श्रीलंकेने हा सामना एकतर्फी ठरवत 77 धावांनी विजय मिळवला. पहिल्या डावात फलंदाजी करताना यजमान संघाने 49.2 षटकांत 244 धावा केल्या. प्रत्युत्तरात बांग्लादेशची सुरुवात चांगली झाली होती त्यांनी दोन गडी गमावत 100 धावा केल्या होत्या. मात्र त्यानंतर त्यांच्या फलंदाजी क्रमाला गळती लागली, अखेरीस संपूर्ण संघ 167 धावांत गारद झाला.
श्रीलंकेकडून वानिंदु हसरंगाने 4 तर कामिंदु मेंडिसने 3 बळी घेतले. त्याने संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. या विजयासह श्रीलंकेने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. आता मालिकेतील दुसरा सामना 5 जुलै रोजी याच मैदानावर खेळवला जाणार असून दोन्ही संघ पुन्हा एकदा आमने-सामने येणार आहेत.






