---Advertisement---

SL vs IND 2nd ODI: दीपक चाहरचा कहर! पठ्ठ्याने शेवटपर्यंत टिकून भारताला मिळवून दिला विजय; मालिकाही घातली खिशात

---Advertisement---

कोलंबो। श्रीलंका विरुद्ध भारत संघात मंगळवारी(२० जुलै) वनडे मालिकेतील दुसरा सामना झाला. आर प्रेमदासा स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारताने ३ विकेट्सने विजय मिळत मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. या सामन्यात भारताकडून दीपक चाहरने ८ व्या क्रमांकावर येऊन नाबाद अर्धशतकी खेळी केली. तर सूर्यकुमार यादवनेही अर्धशतक केले.

श्रीलंकेने भारताला २७६ धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान भारताने ४९.१ षटकात ७ विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण करत सामना जिंकला.

भारताकडून  २७५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी पृथ्वी शॉ आणि शिखर धवन यांची जोडी सलामीला उतरली. शॉने पहिल्या वनडेप्रमाणेच या सामन्यातही पहिल्याच षटकात सलग तीन चौकार मारत आक्रमक सुरुवात केली. मात्र, या आक्रमणानंतरही तो फार काळ टिकू शकला नाही. त्याला तिसऱ्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर १३ धावांवर वनिंदू हसरंगाने त्रिफळाचीत केले. त्याच्या पाठोपाठ ५ व्या षटकात पहिल्या वनडे अर्धशतक झळकावलेला २३ वर्षीय इशान किशन १ धावेवर कसून रजिथा विरुद्ध खेळताना त्रिफळाचीत झाला. त्यामुळे भारतावर ५ षटकांच्या आतच २ विकेट्स गमावण्याची वेळ आली.

त्यानंतरही शिखर धवन आणि मनिष पांडेने डाव सावरण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, धवनला १२ व्या षटकात वनिंदू हसरंगाने २९ धावांवर त्रिफळाचीत करत भारताला तिसरा धक्का दिला. यानंतर मात्र, पांडेने सूर्यकुमारसह अर्धशतकी भागीदारी करत डाव सावरला. पण ५० धावांची भागीदारी झाली असताना पांडे धावबाद झाला. त्याने ३१ चेंडूत ३७ धावा केल्या. त्याच्या पाठोपाठ १८ व्या षटकात हार्दिक पंड्या मोठा फटका मारण्याचा नादात शुन्यावर श्रीलंकेचा कर्णधार दसून शनकाविरुद्ध धनंजय डी सिल्वाकडे झेल देत बाद झाला. त्यामुळे भारताला ५ वा धक्का बसला.

पण, त्यानंतर सूर्यकुमार यादवने कृणाल पंड्याला साथीला घेत सहाव्या विकेटसाठी चांगली भागीदारी करण्यास सुरुवात केली. दरम्यान, सूर्यकुमारने त्याचे पहिले वनडे अर्धशतक पूर्ण केले. मात्र, ४४ धावांची भागीदारी झाली असताना सूर्यकुमार २७ व्या षटकात लक्षण संदकन विरुद्ध पायचीत झाला. सूर्यकुमारने ४४ चेंडूत ६ चौकारांसह ५३ धावा केल्या.

तो बाद झाल्यानंतरही कृणाल आणि दीपक चाहरने संयमी फलंदाजी करत भारताचा धावफलक हलता ठेवला. पण, कृणालही मोक्याच्या क्षणी ३६ व्या षटकात वनिंदू हसरंगा विरुद्ध खेळताना ३५ धावांवर त्रिफळाचीत झाला. त्यामुळे एका क्षणी भारतीय संघ ७ बाद १९३ धावा अशा कठीण परिस्थितीत अडकला होता.

परंतु, दीपक चाहरने भुवनेश्वर कुमारसह काही आक्रमक फटके खेळत दमदार फलंदाजी केली. चाहरने ६४ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. हे त्याचे पहिले वनडे अर्धशतक ठरले. त्याच्या खेळीमुळे भारताने सामन्यात पुनरागमन केले. त्याने अखेरपर्यंत खेळपट्टीवर टीकून राहत भारतीय संघ विजयाच्या पार जाईल याची काळजी घेतली. त्याला भुवनेश्वर कुमारने नाबाद १९ धावा करत चांगली साथ दिली. दीपक चाहर ८२ चेंडूत ७ चौकार आणि १ षटकाराहसह ६९ धावांवर नाबाद राहिला. तो भारताकडून या सामन्यात सर्वाधिक धावा करणाराही फलंदाज ठरला.

श्रीलंकेकडून वनिंदू हसरंगाने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तसेच कसून रजिथा, दसून शनका आणि लक्षण संदकनने प्रत्येकी १ विकेट घेतली.

अविष्का फर्नांडो आणि चरिथ असलंकाची अर्धशतके

श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत ९ बाद २७५ धावा केल्या आणि भारतासमोर विजयासाठी २७६ धावांचे आव्हान ठेवले होते. श्रीलंकेकडून अविष्का फर्नांडो आणि चरिथ असलंका यांनी अर्धशतके केली.

श्रीलंकेचा प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय सलामीला फलंदाजीला आलेल्या अविष्का फर्नांडो आणि मिनोद भानुका यांनी योग्य ठरवत अर्धशतकी भागीदारी रचली. या दोघांनीही भारतीय गोलंदाजांना १३ षटकांपर्यंत कोणतेही यश मिळू दिले नव्हते. मात्र, अखेर त्यांची जोडी फोडण्यात १४ व्या षटकात फिरकीपटू युजवेंद्र चहलला यश आले. त्याने मिनोद भानुकाला या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर ३६ धावांवर बाद केले.

त्याच्या पुढच्याच चेंडूवर कारकिर्दीतील दुसरा वनडे सामना खेळणाऱ्या भानुका राजपक्षला चहलने शुन्यावर माघारी धाडले. त्यामुळे श्रीलंकेला सलग दोन चेंडूंवर दोन धक्के बसले. अविष्का फर्नांडो आणि मिनोद भानुका यांच्यात ७७ धावांची सलामी भागीदारी झाली.

त्यानंतर अविष्का फर्नांडोने धनंजय डी सिल्वाला साथीला घेत श्रीलंकेचा डाव सावरला. त्याने ७० चेंडूत त्याचे अर्धशतक पूर्ण केले. मात्र अर्धशतक पूर्ण होताच फर्नांडो भुवनेश्वर कुमार विरुद्ध कृणाल पंड्याकडे झेल देऊन २५ व्या षटकात बाद झाला. तो बाद झाल्यानंतर धनंजय डी सिल्वाला साथ देण्यासाठी चरिथ असलंका मैदानावर आला.

पण, धनंजय डी सिल्वाही चांगल्या सुरुवातीनंतरही फार मोठी खेळी करु शकला नाही. तो ३२ धावांवर असताना २८ व्या षटकात दीपक चाहरने टाकलेल्या नकल बॉलवर शिखर धवनकडे झेल देऊन बाद झाला. त्यानंतर कर्णधार दसून शनकाने असलंकाची साथ देण्याचा प्रयत्न केला, पण ३६ व्या षटकात चहलने शनकाला १६ धावांवर त्रिफळाचीत केले. पाठोपाठ ४० व्या षटकात वनिंदू हसरंगाला दीपक चाहरने ८ धावावंर त्रिफळाचीत करत पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.

मात्र, यानंतरही असलंकाने एक बाजू सांभाळली होती. त्याने चमिका करुणारत्नेला साथीला घेत ७ व्या विकेटसाठी ५० धावांची भागीदारी रचत श्रीलंकेला २४० धावांचा टप्पा पार करुन दिला. मात्र, अखेर ४८ व्या षटकात असलंका ६८ चेंडूत ६५ धावा करुन भुवनेश्वर कुमारच्या विरुद्ध बाद झाला. भुवनेश्वर कुमारने अखेरच्या षटकात दुश्मंथा चमिराला २ धावांवर बाद केले. याच षटकात लक्षण संदकन शुन्यावर धावबाद झाला. अखेर चमिका करुणारत्नेने शेवटच्या चेंडूवर चौकार मारत श्रीलंकेला २७५ धावसंख्या गाठून दिली. करुणारत्ने ३३ चेंडूत ५ चौकारांसह नाबाद ४४ धावा केल्या.

भारताकडून युजवेंद्र चहल आणि भुवनेश्वर कुमारने सर्वाधिक प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या. तर दीपक चाहरने २ विकेट्स घेतल्या.

श्रीलंकेने जिंकली नाणेफेक

श्रीलंका संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दुसऱ्या वनडे सामन्यासाठी भारताच्या ११ जणांच्या संघात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. तसेच श्रीलंकेच्या ११ जणांच्या संघात १ बदल करण्यात आलेला आहे. इसरु उडानाच्या जागेवर कसून रजिथाला संधी देण्यात आली आहे.

असे आहेत ११ जणांचे दोन्ही संघ –
भारत – शिखर धवन (कर्णधार), पृथ्वी शॉ, इशान किशन (यष्टीरक्षक), मनीष पांडे, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, कृणाल पंड्या, दीपक चहर, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव

श्रीलंका – अविष्का फर्नांडो, मिनोद भानुका (यष्टीरक्षक), भानुका राजपक्ष, धनंजया डी सिल्वा, चरिथ असलंका, दासुन शनाका (कर्णधार), वनिंदू हसरंगा, चमिका करुणारत्ने, कसून रजिथा, दुशमंत चमीरा, लक्षण संदकन

 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---