---Advertisement---

SL vs IND 2nd T20I: अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात श्रीलंकेचा भारतावर ४ विकेट्सने विजय; मालिकेतही बरोबरी

On: बुधवार, जुलै 28, 2021 11:38 PM
---Advertisement---

कोलंबो। श्रीलंका विरुद्ध भारत संघात टी२० मालिकेतील दुसरा सामना बुधवारी खेळला गेला. आर प्रेमदासा स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात श्रीलंकेने ४ विकेट्सने विजय मिळवला. याबरोबरच श्रीलंकेने १-१ अशी मालिकेत बरोबरी केली आहे. त्यामुळे गुरुवारी (२९ जुलै) होणारा तिसरा आणि अखेरचा सामना निर्णायक ठरेल.

दुसऱ्या टी२० सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे भारताने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ५ बाद १३२ धावा करत श्रीलंकेसमोर विजयासाठी १३३ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग श्रीलंका संघाने अखेरच्या षटकात २ चेंडू राखत पूर्ण केला आणि विजय मिळवला.

श्रीलंकेकडून १३३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीला अविष्का फर्नांडो आणि मिनोद भानुका यांनी फलंदाजी केली. मात्र, श्रीलंकेची सुरुवात फारशी बरी झाली नाही. अविष्का फर्नांडो ११ धावा करुन भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर राहुल चाहरकडे झेल देऊन बाद झाला. त्याच्यानंतर सदीरा समरविक्रमादेखील केवळ ८ धावा करुन माघारी परतला. पाठोपाठ कर्णधार दसून शनका कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर ३ धावांवर बाद झाला.

कुलदीपने शनकानंतर खेळपट्टीवर स्थिरावलेल्या मिनोद भानुकाला ३६ धावांवर राहुल चाहरकडे झेल देण्यास भाग पाडले. त्यामुळे एका क्षणी श्रीलंकेची अवस्था ४ बाद ६६ धावा अशी झाली होती. पण यानंतर धनंजय डी सिल्वाने वनिंदू हसरंगाला साथीला घेत श्रीलंकेचा डाव सावरला. पण हसरंगाही १५ व्या षटकात राहुल चाहरच्या गोलंदाजीवर भुवनेश्वर कुमारकडे झेल देऊन बाद झाला. १८ व्या षटकात रमेश मेंडिसने २ धावांवर विकेट गमावली. त्यामुळे या सामन्यात रोमांच उभा राहिला होता.

अखेरच्या षटकात श्रीलंकेला ८ धावांची गरज होती. भारताकडून हे षटक पदार्पणवीर चेतन साकारियाने टाकले. पण, त्याला ८ धावा रोखण्यात अपयश आले. धनंजय डी सिल्वाने चमिका करुणारत्नेच्या मदतीने श्रीलंकेला विजय मिळवून दिला. धनंजय डी सिल्वाने नाबाद ४० धावा केल्या, तर चमिका करुणारत्नेने नाबाद १२ धावा केल्या.

भारताकडून कुलदीप यादवने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या. तसेच राहुल चाहर, भुवनेश्वर कुमार, चेतन साकारिया आणि वरुण चक्रवर्तीने प्रत्येकी १ विकेट घेतली.

भारताच्या २० षटकांत केवळ १३२ धावा 

भारताकडून या सामन्यात कर्णधार शिखर धवनसह ऋतुराज गायकवाडने सलामीला फलंदाजी केली. या दोघांनीही भारताला चांगली सुरुवात करुन दिली होती. पण, ऋतुराज १८ चेंडूत २१ धावांवर दसून शनकाविरुद्ध खेळताना बाद झाला. त्यामुळे त्याची आणि शिखरची ४९ धावांची भागीदारी तुटली.

ऋतुराज बाद झाल्यानंतर शिखरने एक बाजू सांभाळली होती. त्याला देवदत्त पडीक्कलने चांगली साथही दिली होती. पण त्यांची भागीदारी रंगू लागली असतानाच शिखर ४० धावा करुन अकिला धनंजयाच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. त्याच्यापाठोपाठ काहीवेळात पडीक्कल देखील २३ चेंडूत २९ धावा करुन वनिंदू हसरंगाच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. पाठोपाठ अकिला धनंजयाने संजू सॅमसनला केवळ ७ धावांवर बाद केले.

अखेरच्या षटकात नितीश राणा ९ धावांवर बाद झाला. भुवनेश्वर कुमार १३ आणि नवदीप सैनी १ धावेवर नाबाद राहिले. श्रीलंकेच्या गोलंदाजांनी केलेल्या शानदार गोलंदाजीमुळे भारताला २० षटकात ५ बाद १३२ धावाच करता आल्या. श्रीलंकेकडून अकिला धनंजयाने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या. तसेच दुश्मंता चमिरा, वनिंदू हसरंगा आणि दसून शनकाने प्रत्येकी १ विकेट घेतली.

भारताकडून ४ खेळाडूंचे पदार्पण

हा सामना मंगळवारी (२७ जुलै) होणार होता. मात्र, भारताता अष्टपैलू क्रिकेटपटू कृणाल पंड्या कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने हा सामना एक दिवसाने पुढे ढकलण्यात आला. तसेच कृणालच्या संपर्कात आलेले काही खेळाडूही सध्या आयसोलेशनमध्ये असल्याने ४ खेळाडूंना आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी मिळाली आहे.

या सामन्यातून भारताकडून ऋतुराज गायकवाड, देवदत्त पडीक्कल, नितीश राणा आणि चेतन सकारिया हे चार खेळाडू टी२० पदार्पण करत आहेत. तसेच श्रीलंकाच्या ११ जणांच्या संघात २ बदल करण्यात आले आहेत.

असे आहेत ११ जणांचे संघ – 

भारत – शिखर धवन (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, देवदत्त पडिक्कल, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), नितीश राणा, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव, राहुल चाहर, नवदीप सैनी, चेतन साकारीया, वरुण चक्रवर्ती.

श्रीलंका – अविष्का फर्नांडो, मिनोद भानुका (यष्टीरक्षक), धनंजया डी सिल्वा, सदीरा समरविक्रमा, दसून शनाका (कर्णधार), रमेश मेंडिस, वनिंदू हसरंगा, चमिका करुणारत्ने, इसुरु उडाना, अकिला धनंजया, दुश्मंता चमीरा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---