श्रीलंका क्रिकेट बोर्डानं पुढील महिन्यात न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. मात्र या मालिकेतील पहिल्या सामन्यावर नजर टाकल्यास तुम्हाला काहितरी वेगळं जाणवेल.
साधारणतः एक कसोटी सामना पाच दिवसांचा असतो. परंतु गाले येथे खेळली जाणारी पहिली कसोटी 6 दिवसांची असेल. यामागचं कारण असं की, या कसोटी सामन्यादरम्यान श्रीलंकेत निवडणुका होणार आहेत. श्रीलंका विरुद्ध न्यूझीलंड कसोटी सामना 18 सप्टेंबर ते 23 सप्टेंबर या कालावधीत खेळला जाईल. 21 सप्टेंबर हा विश्रांतीचा दिवस असेल, कारण या दिवशी श्रीलंकेत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका होणार आहेत.
गेल्या दोन दशकांत श्रीलंकेच्या संघानं 6 दिवसांचा कसोटी सामना खेळण्याची ही पहिलीच वेळ असेल. शेवटच्या वेळी 2001 मध्ये कोलंबोमध्ये झिम्बाब्वेविरुद्धच्या कसोटीत असं घडलं होते. तेव्हा श्रीलंकेतील पारंपारिक सण ‘पोया’ साठी एका दिवसाची विश्रांती घेण्यात आली होती. गेल्या शतकात कसोटी सामन्यादरम्यान एक विश्रांतीचा दिवस ही सामान्य प्रथा होती. इंग्लंडमध्ये बरेच सामने सहा दिवसांचे खेळले गेले आहेत. काहीवेळा तर रविवारी असल्यामुळे देखील विश्रांती घेण्यात आली आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये शेवटच्या वेळी 2008 मध्ये बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यातील सामन्यादरम्यान विश्रांतीचा दिवस घोषित करण्यात आला होता. संसदीय निवडणुकांमुळे बांगलादेशनं श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतील त्यांच्या पहिल्या सामन्यात एका विश्रांतीच्या दिवसाचा समावेश केला होता.
सध्या चालू असलेल्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-25 मध्ये श्रीलंका आणि न्यूझीलंड हे दोन संघ फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठीचे प्रबळ दावेदार आहेत. हे दोन्ही संघ सध्या गुणतालिकेत अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहेत. श्रीलंकेविरुद्धची मालिका न्यूझीलंडच्या आशिया दौऱ्याचा भाग असेल. या मालिकेनंतर किवी संघाला अफगाणिस्तानविरुद्ध एक कसोटी आणि भारताविरुद्धची तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे.
हेही वाचा –
पाकिस्तानी कर्णधारावर फिक्सिंगचा आरोप? मोहम्मद रिझवानबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित!
क्रिकेटविश्वात खळबळ! भारताविरुद्धच्या मालिकेपूर्वी दिग्गज खेळाडूवर हत्येचा आरोप
‘या’ दिग्गज गोलंदाजांनी घेतली एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा हॅट्रिक! एका भारतीयाचा समावेश