---Advertisement---

फलंदाजांनी चोपलं, गोलंदाजांंनी रोखलं! श्रीलंकेकडून पाकिस्तानचा अवघ्या 1 धावेने पराभव, फायनल भारतासोबत

On: गुरूवार, ऑक्टोबर 13, 2022 5:17 PM
SL-vs-PAK
---Advertisement---

महिला आशिया चषक 2022मधील दुसरा उपांत्य सामना गुरुवारी (दि. 13 ऑक्टोबर) श्रीलंका विरुद्ध पाकिस्तान संघात पार पडला. सिल्हेट मैदानावर पार पडलेल्या या सामन्यात श्रीलंकाने शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला. श्रीलंकाने अवघ्या 1 धावेने पाकिस्तानला धूळ चारत सामना नावावर केला आणि अंतिम सामन्यात धडक दिली. श्रीलंकेच्या या विजयाची शिल्पकार इनोका रणवीरा ठरली. तिला ‘प्लेअर ऑफ द मॅच’ पुरस्काराने गौरवण्यात आले.

या सामन्यात श्रीलंका संघाने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी कर्णधार चमारी अट्टापट्टू (Chamari Athapaththu) हिने घेतलेला हा निर्णय त्यांच्या महिला फलंदाजांनी सार्थ ठरवला. यावेळी त्यांनी निर्धारित 20 षटकात 6 विकेट्स गमावत 122 धावा चोपल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तान महिला संघाला 6 विकेट्स गमावत फक्त 121 धावाच करता आल्या. त्यामुळे श्रीलंका संघाने हा सामना 1 धावेने जिंकत अंतिम सामन्यात पोहोचण्याचा मान मिळवला.

https://twitter.com/ICC/status/1580509388237840385

पाकिस्तान महिला संघाकडून फलंदाजी करताना कर्णधार बिस्माह मरूफ (Bismah Maroof) हिने सर्वाधिक धावा चोपल्या. तिने 41 चेंडूत 42 धावा केल्या. या धावा करताना तिने 4 चौकारही मारले. तिच्याव्यतिरिक्त निदा दार (26), मुनीबा अली (18) यांनीही योगदान दिले. त्यांच्याव्यतिरिक्त इतर एकाही फलंदाजाला 10 धावांचा आकडा पार करता आला नाही.

यावेळी श्रीलंका संघाकडून गोलंदाजी करताना कर्णधार इनोका रणवीरा हिने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. तिने 2 षटके गोलंदाजी करताना 8 धावा देत 2 विकेट्स आपल्या नावावर केल्या. तिच्याव्यतिरिक्त सुगंधिका कुमारी आणि कविशा दिलहारी यांनी प्रत्येकी एक विकेट घेत समाधान मानले.

तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना हर्षिता समरविक्रमा (Harshitha Samarawickrama) हिने सर्वाधिक धावा चोपल्या. तिने 41 चेंडूत 35 धावा केल्या. या धावा करताना तिने 1 चौकार आणि 1 षटकारही मारला. तिच्याव्यतिरिक्त अनुष्का संजीवनी (26) हिलाच 20 धावांचा आकडा पार करता आला. इतर फलंदाजांमध्ये निलाक्षी डी सिल्वा (14), हसिनी परेरा (13) आणि कर्णधार चमारी अट्टापट्टू हिने 10 धावांचे योगदान दिले. त्यांच्या या धावांमुळे संघाला 122 धावांचा डोंगर उभा करण्यात हातभार लागला.

यावेळी पाकिस्तान संघाकडून गोलंदाजी करताना नशरा संधू (Nashra Sandhu) हिने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. तिने 4 षटके गोलंदाजी करताना 17 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. तिच्याव्यतिरिक्त सदिया इकबाल, निदा दार आणि ऐमन अनवर यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

या विजयानंतर श्रीलंका संघाने अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. श्रीलंका संघ शनिवारी (दि. 15 ऑक्टोबर) महिला आशिया चषक 2022च्या अंतिम सामन्यात भारतीय संघाशी भिडणार आहे. विशेष म्हणजे, या स्पर्धेच्या दुसऱ्या आणि उभय संघातील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला होता. आता अंतिम सामन्यात कोणता संघ विजय मिळवतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. पुरुष श्रीलंका संघाने यावर्षीचा आशिया चषक जिंकला आहे. त्यामुळे जर श्रीलंका महिला संघाने हा किताब जिंकला, तर आशिया चषक स्पर्धेत इतिहास रचला जाईल.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रवी शास्त्रींचे मोठे विधान; म्हणाले, ‘बिन्नी बीसीसीआयचे अध्यक्ष झाले तर…’
जयस्वालचा षटकार थेट स्टेडिअमच्या बाहेर, गोलंदाजही पाहतच राहिला; पठ्ठ्याने स्वत:च शेअर केला व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---