---Advertisement---

SL vs IND 1st ODI : धवनचे कर्णधारपदाला साजेसे अर्धशतक, इशान किशनही चमकला; भारताकडून श्रीलंकेचा 7 विकेट्सने पराभव

On: रविवार, जुलै 18, 2021 10:13 PM
---Advertisement---

कोलंबो। श्रीलंका विरुद्ध भारत संघात रविवारी (१८ जुलै) वनडे मालिकेतील पहिला सामना खेळला जात आहे. आर प्रेमदासा स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात भारताने ७ विकेट्सने विजय मिळवला. तसेच ३ सामन्यांच्या या वनडे मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. भारताकडून प्रभारी कर्णधार शिखर धवन आणि पदार्पणवीर इशान किशनने अर्धशतके झळकावली.

शिखर, इशानची अर्धशतकं

श्रीलंकने दिलेल्या २६३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी भारताकडून पृथ्वी शॉ आणि शिखर धवन यांची जोडी उतरली. एका बाजूने कर्णधार शिखरने डाव सांभाळला होता. तर, दुसरीकडे शॉने आक्रमक खेळ केला. पण शॉ ६ व्या षटकात २४ चेंडूत ९ चौकारांसह ४३ धावा करुन बाद झाला.

तो बाद झाला असला तरी बर्थडे बॉय इशान किशनने मैदानात येताच श्रीलंकेच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजवण्यास सुरुवात केली. त्याने पहिल्याच चेंडूवर षटकार खेचत आपला इरादा स्पष्ट केला. त्याने ३३ चेंडूत त्याचे अर्धशतकही पूर्ण केले. विशेष म्हणजे हा इशानचा पदार्पणाचा वनडे सामना होता.

मात्र, अर्धशतक झळकावल्यानंतर तो लक्षण संदकनविरुद्ध खेळताना १८ व्या षटकात ४२ चेंडूत ८ चौकार आणि २ षटकारासह ५९ धावा करुन मिनोद भानुकाकडे झेल देऊन बाद झाला. इशान आणि शिखर यांच्यात ८५ धावांची भागीदारी झाली. इशान बाद झाल्यानंतरही दुसरी बाजू शिखरने खंबीरपणे सांभाळली होती. त्याने मिनिष पांडेला साथीला घेत भारताचा डाव पुढे नेला. दरम्यान, शिखरने कारकिर्दीत ६००० वनडे धावा पूर्ण केल्या. शिखरने ६१ चेंडूत त्याचे अर्धशतक पूर्ण केले. हे त्याचे वनडेतील ३३ वे अर्धशतक ठरले.

शिखर आणि मनिष यांची अर्धशतकी भागिदारी रंगत असतानाच मनिषला २६ धावांवर धनंजय डी सिल्वाने बाद केले. पण, तोपर्यंत भारतीय संघ विजयाच्या समीप पोहचला होता. मनिष आणि शिखर यांनीही ७२ धावांची भागीदारी रचली. मनिष बाद झाल्यानंतर अखेर शिखरने सूर्यकुमारला साथीला घेत भारताला विजय मिळवून दिला.

शिखरने ९५ चेंडूत ६ चौकार आणि १ षटकारासह नाबाद ८६ धावा केल्या. तर सूर्यकुमार ३१ धावांवर नाबाद राहिला. श्रीलंकेकडून धनंजय डी सिल्वाने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या. तर लक्षण संदकनने १ विकेट घेतली.

श्रीलंकेच्या २६२ धावा

या सामन्यात श्रीलंका संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्यामुळे श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत ९ बाद २६२ धावा केल्या.

श्रीलंकेकडून अविष्का फर्नांडो आणि मिनोद भानुका यांनी सलामीला फलंदाजीला येत श्रीलंकेला आशादायी सुरुवात दिली. मात्र, त्यांची भागीदारी रंगत असतानाच युजवेंद्र चहलने १० व्या षटकात फर्नांडोला ३२ धावांवर बाद करत श्रीलंकेला पहिला धक्का दिला. फर्नांडो आणि भानुका यांनी सलामीला ४९ धावांची भागीदारी केली.

त्यानंतर पदार्पणवीर भानुका राजपक्षने मिनोद भानुकाला चांगली साथ दिली. मात्र, या दोघांनाही १७ व्या षटकात कुलदीप यादवने माघारी धाडत श्रीलंकेला लागोपाठ २ धक्के दिले. राजपक्षने २४ आणि मिनोद भानुकाने २७ धावांची खेळी केली.

त्यानंतरही धनंजय डी सिल्वा आणि चरिथ असलंकाने श्रीलंकेचा डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. मात्र, धनंजय डी सिल्वाला कृणाल पंड्याने २५ व्या षटकात १४ धावांवर बाद केले. त्यानंतर दीपक चाहरने अनुक्रमे ३८ आणि ४० व्या षटकात असलंकाला ३८ धावांवर आणि वनिंदू हसरंगाला ८ धावांवर बाद केले. यावेळी एक बाजू कर्णधार दसून शनकाने धरुन ठेवली होती. पण त्यालाही चहलने ३९ धावांवर खेळत असताना हार्दिक पंड्याकडे झेल देण्यास भाग पाडले. त्यामुळे श्रीलंकेला ७ वा धक्का बसला.

पुढे ४७ व्या षटकात हार्दिक पंड्याने इसरु उडानालाही ८ धावांवर बाद केले. पण, नंतर अखेरच्या षटकांमध्ये चमिका करुणारत्ने आणि दुशमंत चमीराने आक्रमक खेळ केला. त्यामुळे श्रीलंकेला २६२ धावसंख्या उभारण्यात मदत झाली. अखेरच्या चेंडूवर चमीरा १३ धावांवर धावबाद झाला. तर करुणारत्नेने १ चौकार आणि २ षटकारांसह ३५ चेंडूत सर्वाधिक नाबाद ४३ धावा केल्या.

भारताकडून कुलदीप यादव, युजवेंद्र चहल आणि दीपक चाहर यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. तसेच कृणाल पंड्या आणि हार्दिक पंड्याने प्रत्येकी १ विकेट घेतली.

श्रीलंकेने जिंकली नाणेफेक

श्रीलंका संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यातून भारताकडून इशान किशन आणि सूर्यकुमार यादव या दोन खेळाडूंनी वनडे पदार्पण केले आहे. तसेच श्रीलंकेकडून भानुका राजपक्ष याने वनडे पदार्पण केले आहे.

असे आहेत ११ जणांचे दोन्ही संघ –
भारत – शिखर धवन (कर्णधार), पृथ्वी शॉ, इशान किशन (यष्टीरक्षक), मनीष पांडे, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, कृणाल पंड्या, दीपक चहर, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव

श्रीलंका – अविष्का फर्नांडो, मिनोद भानुका (यष्टीरक्षक), भानुका राजपक्ष, धनंजया डी सिल्वा, चरिथ असलंका, दासुन शनाका (कर्णधार), वनिंदू हसरंगा, चमिका करुणारत्ने, इसुरु उडाना, दुशमंत चमीरा, लक्षण संदकन

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---