नुकत्याच आयसीसीने घोषित केलेल्या क्रमवारीत ऑस्ट्रेलियन कर्णधार स्मिथ अव्वल स्थानी विराजमान झाला आहे परंतु त्याहीपेक्षा एक मोठा विक्रम स्मिथने केला आहे. तो विक्रम म्हणजे सार्वकालीन कसोटी फलंदाज रेटिंग अर्थात ऑल टाइम आयसीसी टेस्ट रेटिंग मध्ये स्मिथ पाचव्या स्थानावर आला आहे. स्मिथचे सध्या आयसीसी टेस्ट रेटिंग ९४१ एवढे आहे.
भारत दौऱ्यावर असणारा ऑस्ट्रेलियन संघ जरी जिंकण्यासाठी धडपडत असेल तरी कर्णधार स्मिथ येथेही खोऱ्याने धावा ओढत आहे. पुणे कसोटी २७ आणि १०९, बेंगलोर कसोटी ८ आणि २८ तर रांची कसोटी १७८* आणि २१ अश्या धावा करणाऱ्या स्मिथला एकंदरीतच भारतामधील कामगिरीचा आयसीसी रेटिंगमध्ये खूपच फायदा झाला. स्मिथने संगकारा, कॅलिस, मोहम्मद युसूफ, हेडन गॅरी सोबर्स, रिचर्ड्स यांच्या सारख्या सार्वकालीन महान खेळाडूंना मागे टाकून हा क्रमांक पटकावला आहे. सध्या स्मिथच्या पुढे ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग, प्रथम श्रेणीमध्ये विक्रमी धावा आणि शतके करणारे जॅक हॉब्स, इंग्लंडचे महान फलंदाज सर लेओनार्ड हूटटोन आणि सार्वकालीन महान फलंदाज डोनाल्ड ब्रॅडमन आहेत.
डोनाल्ड ब्रॅडमन यांनी १९४८ साली सर्वाधिक अर्थात ९६१ आयसीसी कसोटी फलंदाज रेटिंग कमावले होते. सध्या स्मिथचे ९४१ रेटिंग आहे. येत्या काळात स्मिथ जर असाच खेळत राहिला तर हे रेकॉर्ड निश्चित तुटेल. स्मिथ पुढील कसोटी सामना भारताविरुद्ध धर्मशाळा येथे खेळणार आहे.
सार्वकालीन कसोटी फलंदाज रेटिंग
९६१ डोनाल्ड ब्रॅडमन
९४५ सर लेओनार्ड हूटटोन
९४५ जॅक हॉब्स
९४२ रिकी पॉन्टिंग
९४१ स्टिव्ह स्मिथ