आज आयसीसीने कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे. या क्रमवारीत ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टिव्ह स्मिथने कारकिर्दीतील सर्वोत्तम गुण मिळवून सार्वकालीन कसोटी क्रमवारीत दुसरे स्थान मिळवले आहे.या क्रमवारीत महान फलंदाज डॉन ब्रॅडमन अव्वल स्थानी आहेत.
स्मिथ सध्या ९४५ गुणांसह अव्वल स्थानी कायम आहे. ब्रॅडमन यांचे ९६१ हे सर्वोत्तम गुण होते. त्यामुळे स्मिथला ब्रॅडमन यांच्या या विक्रमाशी बरोबरी करण्याची संधी निर्माण झाली आहे.
१० फेब्रुवारी १९४८ साली भारताविरुद्ध खेळताना ब्रॅडमन यांनी कारकिर्दीतील सर्वोत्तम अर्थात ९६१ गुण मिळवले होते. तेव्हा आयसीसी क्रमवारी सुरु झाली नव्हती. आयसीसी क्रमवारीची सुरुवात १९८० या वर्षी सुरु झाली. त्यामुळे तेव्हा ब्रॅडमन यांच्या ह्या कामगिरीचा कुणाला नक्की अंदाज आला नव्हता.
परंतु नंतरच्या काळात ह्या धावांची आणि सामन्यांची सांगड घालून ती क्रमवारी काढण्यात आली. गेल्या १०वर्षात अनेक खेळाडू या विक्रमपर्यंत पोहचले. त्यात रिकी पॉन्टिंग, कुमार संगकारा आणि एबी डिव्हिलिअर्स यांचा समावेश आहे. परंतु कुणालाही हा विक्रम मोडता आला नाही.
https://twitter.com/Maha_Sports/status/943048193016659968
सध्या कारकिर्दीतील सर्वोत्तम फॉर्ममध्ये असणाऱ्या स्मिथला मात्र हा विक्रम मोडण्याची मोठी संधी आहे. स्मिथने सध्या सुरु असलेल्या ॲशेस मालिकेतील तिसऱ्या सामन्यात द्विशतक साजरे करताना २३९ धावांची खेळी केली होती, याची स्मिथला क्रमवारीत गुण वाढवण्यात त्याला मदत झाली आहे. या ॲशेस मालिकेत ऑस्ट्रेलियाने ३-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. अजूनही २ सामने बाकी आहेत.
सार्वकालीन कसोटी क्रमवारीत स्मिथने लेन हटन यांची बरोबरी केली आहे. त्यांचेही ९४५ हे क्रमवारीतील सर्वोत्तम गुण होते. याबरोबरच स्मिथने पीटर मे, रिकी पॉन्टिंग आणि जॅक हॉब्स यांनादेखील मागे टाकले आहे.
स्मिथने आजपर्यंत ५९ कसोटीत ६२.३२ च्या सरासरीने ५७९६ धावा केल्या आहेत. यात त्याची २२ शतके तर २१ अर्धशतके केली आहेत. तसेच डॉन ब्रॅडमन यांनी ५२ कसोटीत ९९.९४ सरासरीने ६९९६ धावा केल्या होत्या. त्यांनी २९ शतके आणि १३ अर्धशतके केली आहेत.