हेमिल्टन। न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या महिला विश्वचषक स्पर्धेत शनिवारी भारतीय महिला विरुद्ध वेस्ट इंडिज महिला (India Women vs West Indies Women) संघांत सामना झाला. सेडन पार्क येथे झालेल्या या सामन्यात सलामीवीर स्म्रीती मंधना आणि उपकर्णधार हरमनप्रीत कौर या दोघींनी शतकी खेळी करत भारताला तब्बल ३१७ धावांचा डोंगर उभा करून दिला. याबरोबरच या दोघींनी केलेली दीडशतकी भागीदारी विक्रमी ठरली.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाकडून मंधना (Smriti Mandhana) आणि यास्तिका भाटिया यांनी सलामीला ४९ धावांची भागीदारी करत चांगली सुरुवात केली होती. पण आक्रमक खेळ करत भाटिया ३१ धावांवर बाद झाली. पाठोपाठ कर्णधार मिताली राज ५ धावांवर आणि दिप्ती शर्मा १५ धावांवर माघारी परतल्या. त्यामुळे मागील काही सामन्यांप्रमाणे पुन्हा एकदा भारताची मधली फळी कोलमडणार असं वाटत असतानाच मंधनाला हरमनप्रीत कौरची (Harmanpreet Kaur) भक्कम साथ मिळाली.
मंधना आणि कौरने सातत्याने धावफलक हलता ठेवत दीडशतकी भागीदारी रचली आणि भारताला २६० धावांचा टप्पाही पार करून दिला. या दोघींनी चौथ्या विकेटसाठी १७४ चेंडूत १८४ धावांची भागीदारी केली. त्यामुळे या दोघींनी केलेली ही भागीदारी भारताकडून महिला वनडे विश्वचषकात केलेली सर्वोच्च धावांची भागीदारी ठरली आहे.
यापूर्वी भारताकडून महिला वनडे विश्वचषकात (Women’s World Cup) सर्वोच्च भागीदारी करण्याचा विक्रम पुनम राऊत आणि तिरुश कामिनी यांच्या नावावर होता. त्यांनी २०१३ साली विश्वचषकात वेस्ट इंडिजविरुद्धच पहिल्या विकेटसाठी १७५ धावांची भागीदारी केली होती. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर मिताली राज आणि पुनम राऊत आहे. त्यांनी २०१७ च्या विश्वचषकात ऑस्ट्रेलिया विरुद्ध १५७ धावांची भागीदारी केली होती.
मंधना-हरमनप्रीत यांची शतके
शनिवारी वेस्ट इंडिजविरुद्ध मंधना आणि हरमनप्रीत या दोघींनीही दमदार कामगिरी करताना शतकी खेळीही केल्या. मंधनाने ११९ चेंडूत १२३ धावांची खेळी केली. या खेळीत तिने १३ चौकार आणि २ षटकार मारले. हे मंधनाचे वनडे विश्वचषकातील दुसरे शतक आहे. तसेच हरमनप्रीतने १०७ चेंडूत १०९ धावांची खेळी केली. या खेळीत तिने १० चौकार आणि २ षटकार ठोकले. हे तिचे विश्वचषकातील तिसरे शतक असून ती वनडे विश्वचषकात तीन शतके करणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
स्म्रीती मंधनाचे रेकॉर्डब्रेक शतक! विश्वचषकात १२३ धावांच्या खेळीसह तीन विक्रमात पटकावले अव्वल स्थान
कॅलिसच्या ‘त्या’ शब्दांनी जादू केली अन् दक्षिण आफ्रिकेने ४३५ धावांचे आव्हान सहज पार केले