भारतीय महिला संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. श्रीलंका आणि भारत यांच्यातील दुसऱ्या टी-२० सामन्यात स्मृती मंधानाने मैफिल लुटली. मधानाने शनिवारी (२५ जून) खेळल्या गेलेल्या सामन्यात सर्वाधिक धावांचे योगदान दिले आणि भारताचा विजय सोपा बनवला. उभय संघातील हा सामना दांबुलामध्ये खेळला गेला असून, त्याठिकाणी मंधानाचा एक जबरा चाहता उपस्थित होता. भारताने हा सामना ५ विकेट्स राखून नावावर केला.
श्रीलंका संघाने नाणेफेक जिंकून या सामन्यात प्रथम फलंदाजी केली. श्रीलंकेच्या डावाच्या १४ व्या षटकात कॅमेरामॅनची नजर या स्मृती मंधानाच्या चाहत्यावर पडली. हा चाहता हातात एक पोस्टर पकडून हसताना दिसत होता. पिवळ्या रंगाच्या या पोस्टवर लिहिले होते की, “पेट्रोल नाहीये, पण तरीही स्मृती मंधानाला पाहण्यासाठी आलो आहे.” वास्तविक पाहता श्रीलंका सध्या आर्थिक संकटात सापडला आहे आणि याच कारणास्तवत त्याठिकाणी इंधन टंचाई देखील आहे. श्रीलंकेत सुरू असलेल्या या टी-२० मालिकेतील या चाहत्याकडे पाहून एक गोष्ट नक्कीस सिद्ध होते की, स्मृती मंधाना (Smriti Mandhana) फक्त भारतातच नाही जगभरात लोकप्रीय आहे.
https://twitter.com/poorna_kavinda/status/1540629196203913216
सामन्याचा विचार केला, तर श्रीलंकन संघाने प्रथम फलंदाजी करताना ७ विकेट्सच्या नुकसानावर अवघ्या १२५ धावा केल्या. त्यांच्या सलामीवीर जोडीने संघाला चांगली सुरुवात दिली, पण त्यानंतर एकाही खेळाडूला दोन आकडी धावा करता आल्या नाही. प्रत्युत्तरात भारतीय संघाने हे लक्ष्य १९.१ षटकात आणि ५ विकेट्सच्या नुकसानावर गाठले.
भारतीय संघाची उपकर्णधार स्मृती मंधानाने ३४ चेंडूत सर्वाधिक ३९ धावा केल्या. तर कर्णधार हरमनप्रीत कौरने ३२ चेंडूत महत्वाच्या ३१ धावा करून संघाला विजय मिळवून दिला. मंधानाने या सामन्यात टी-२० आंतरराष्ट्रीयमध्ये स्वतःच्या २००० धावा पूर्ण केल्या. सर्वात कमी डावांमध्ये अशी कामगिरी करणारी ती भारताची दुसरी, तर एकंदरीत तिसरी भारतीय महिला खेळाडू बनली आहे. यापूर्वी मिताली राज आणि हरमनप्रीतने ही कामगिरी केली होती.






