वुमेन्स महाराष्ट्र प्रीमियर लीग 2025 स्पर्धेत सातवा सामना सोलापूर स्मॅशर्स विरुद्ध रत्नागिरी जेट्स असा खेळला गेला. गहुंजे येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात सोलापूर स्मॅशर्सने 19 धावांनी दणदणीत विजय मिळवला. त्यांचा हा चार सामन्यातील तिसरा विजय ठरला. कर्णधार तेजल हसबनीस हिने संघासाठी वेगवान अर्धशतक झळकावले.
गुणतालिकेत दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी असलेल्या या दोन संघांमध्ये दुपारच्या सत्रात सामना खेळला गेला. प्रथम फलंदाजीची संधी मिळाल्यावर सोलापूर संघाची सलामीवीर ईश्वरी अवसरे पहिल्याच चेंडूवर बाद झाली. त्यानंतर मात्र कर्णधार तेजल हसबनीस व ईश्वरी सावकार यांनी मैदानावर नांगर टाकला. दोघींनी खराब चेंडूंचा समाचार घेत वेगाने धावा काढण्यास सुरुवात केली. यादरम्यान दोघींनी देखील आपली अर्धशतके झळकावली. तेजल व ईश्वरी या जोडीने 82 चेंडूंमध्ये 130 धावांची भागीदारी करत रत्नागिरी संघावर दडपण आणले. या दोघींच्या योगदानामुळेच संघाने 20 षटकात 170 अशी मोठी धावसंख्या उभारली.
तेजल हसबनीस हिने बाद होण्यापूर्वी केवळ 39 चेंडूंमध्ये 11 चौकार 2 षटकारांच्या मदतीने 70 धावा केल्या. तर, ईश्वरी सावकार हिने एक बाजू लावून धरताना 62 चेंडू खेळत 75 धावांचे योगदान दिले. यामध्ये सात चौकार सामील होते. रत्नागिरीसाठी अनुश्री स्वामी हिने सर्वाधिक तीन बळी टिपले.
विजयासाठी मिळालेले 171 धावांच्या मोठ्या आव्हानासमोर रत्नागिरीची सुरुवात जबरदस्त झाली. गौतमी नाईक तिने पहिल्याच षटकात शरयू कुलकर्णी हिच्यावर हल्ला चढवत तब्बल 26 धावा लुटल्या. मात्र, 38-0 या धावसंख्येवरून संघाची घसरण 48-3 अशी झाली. कर्णधार स्मृती मंधाना हिने मधल्या फळीत खेळताना 39 चेंडूंमध्ये वेगवान 52 धावा ठोकल्या. परंतु, ती बाद झाल्यानंतर ज्ञानदा निकम वगळता कोणीही संघर्ष करताना दिसले नाही. परिणामी, 19.1 षटकात संघ 151 धावांवर सर्वबाद झाला. सोलापूरसाठी लक्ष्मी यादव हिने तीन तर मुक्ता मगरे हिने दोन बळी मिळवले.






