भारतीय क्रिकेट संघातील युवा यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंतने सोमवारी (४ ऑक्टोबर) आपला २४ वा वाढदिवस साजरा केला. भारतीय संघात चमकदार कामगिरी केल्यानंतर आयपीएल स्पर्धेत देखील त्याचा बोलबाला सुरू आहे. सध्या तो आयपीएल स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्स संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. त्याच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्स संघाने प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. तसेच जेतेपद मिळवण्यासाठी देखील दिल्ली कॅपिटल्स संघाला प्रबळ दावेदार मानले जात आहे.
दिल्लीच्या या फलंदाजाने आपल्या कारकीर्दीत अनेक मोठ मोठे विक्रम आपल्या नावावर केले आहेत. चला तर जाणून घेऊया त्याने केलेल्या विक्रमांबद्दल अधिक माहिती.
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद १ हजार धावा करणारा भारतीय यष्टिरक्षक फलंदाज
भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीला मागे टाकत रिषभ पंतने यष्टिरक्षक म्हणून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद १ हजार धावा पूर्ण करण्याचा पराक्रम केला होता. त्याने २०२०-२१ मध्ये झालेल्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये गाबामध्ये झालेल्या कसोटी सामन्यात पराक्रम केला होता.
माजी भारतीय कर्णधार एमएस धोनीने हा कारनामा ३२ डावात केला होता. तर रिषभ पंतने हा कारनामा २७ डावात केला. कसोटी क्रिकेटमध्ये १ हजार धावा पूर्ण करणारा रिषभ पंत ७ वा भारतीय यष्टिरक्षक फलंदाज आहे.
असा भारतीय फलंदाज ज्याने षटकार मारून केली होती कसोटी कारकिर्दीची सुरुवात
रिषभ पंतने २०१८ मध्ये इंग्लंड संघाविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत पदार्पण केले होते. ट्रेंट ब्रिजच्या मैदानावर पार पडलेल्या या सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहलीने त्याला कसोटी क्रिकेटच्या पदार्पणाची कॅप दिली होती. या सामन्यात जेव्हा तो फलंदाजीला आला त्यावेळी आदिल रशिद गोलंदाजी करत होता. त्याने आपल्या डावातील दुसऱ्याच चेंडूवर षटकार मारला आणि आपल्या क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात केली होती. हा सामना भारतीय संघाने २०३ धावांनी आपल्या नावावर केला होता.
यष्टीरक्षक म्हणून एकाच सामन्यात टिपले आहेत सर्वाधिक झेल
रिषभ पंतने २०१८ मध्ये ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात यष्टीमागे एकूण ११ झेल टिपले होते. त्याने पहिल्या डावात ६, तर दुसऱ्या डावात ५ झेल टिपले होते. यासह त्याने एकाच सामन्यात सर्वाधिक झेल टिपण्याचा विक्रम देखील आपल्या नावावर केला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
अवघड झालंय! टी२० विश्वचषकापूर्वी टीम इंडियाला सतावत आहे ‘या’ ५ गोष्टींची चिंता
काय सांगता? सामना तीन दिवसांवर असताना ‘या’ संघातील खेळाडूंचे क्रिकेट किट गेले चोरीला






