---Advertisement---

जे म्हटले ते करुनच दाखवले! चेन्नईच्या विजयाचा शिल्पकार वॉटसनचे खास ट्विट व्हायरल

On: सोमवार, ऑक्टोबर 5, 2020 9:52 AM
---Advertisement---

आयपीएल २०२० च्या हंगामात सलग तीन पराभवांनंतर अखेर रविवारी(४ ऑक्टोबर) चेन्नई सुपर किंग्सची गाडी विजयी मार्गावर परतली. चेन्नईने किंग्स इलेव्हन पंजाबचा १० विकेट्सने पराभव करत या हंगामातील दुसरा विजय नोंदवला. चेन्नईच्या या विजयात शेन वॉटसन आणि फाफ डु प्लेसिसचे मोलाचे योगदान राहिले. या दोघांनीही नाबाद १८१ धावांची शानदार भागीदारी रचली. यात वॉटसनने ८३ आणि डु प्लेसिसने ८७ धावांचे योगदान दिले.

वॉटसनसठी ही खेळी अधिक खास ठरली. कारण तो गेल्या चार सामन्यात सपशेल अपयशी ठरला होता. त्याचे अपयश चेन्नई संघालाही दबावात टाकत होते. चेन्नईने मुंबई इंडियन्सवर विजय मिळवलेल्या पहिल्या सामन्यात त्याने केवळ ४ धावा केल्या होत्या. तसेच त्यानंतर राजस्थान रॉयल्स, दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद या ३ संघांविरुद्ध त्याने अनुक्रमे ३३, १४ आणि १ धावा केल्या होत्या. या तीनही सामन्यात चेन्नईचा पराभव झाला होता. पण रविवारी वॉटसनने ११ चौकार आणि ३ षटकारांसह ५३ चेंडूत नाबाद ८३ धावा करत स्वत:ला सिद्ध केले.

वॉटसनच्या या दमदार खेळीनंतर त्याचे एक ट्विट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हे ट्विट त्याने पंजाब विरुद्धच्या सामन्याआधी शनिवारी केले होते. यामध्ये त्याने म्हटले होते की ‘चेन्नईसाठी परिपूर्ण खेळ लवकरच होईल!!!’ अखेर त्याने म्हटल्याप्रमाणे रविवारी त्याने परिपूर्ण अशा खेळाचे प्रदर्शन केले.

वॉटसनच्या या ट्विटवर चाहत्यांच्याही अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत. यात चाहत्यांनी वॉटसनचे कौतुक केले आहे.

आता चेन्नई सुपर किंग्सचा पुढील सामना ७ ऑक्टोबरला आबू धाबी येथे कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध होणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---