गुरुवारी (१४ जानेवारी) न्यूझीलंडमध्ये देशांतर्गत महिला ट्वेंटी-ट्वेंटी स्पर्धेत ओटागो महिला संघ विरुद्ध वेलिंग्टन महिला संघात सामना पार पडला. या सामन्यात न्यूझीलंडच्या राष्ट्रीय महिला संघाची कर्णधार सोफी डिवाईन वेलिंग्टनकडून खेळत असताना एक खास विश्वविक्रम केला आहे. या सामन्यात तिने केवळ ३६ चेंडूत शतकी खेळी केली आहे.
या सामन्यात ओटागोने प्रथम फलंदाजी करताना १२८ धावा करत १२९ धावांचे आव्हान वेलिंग्टन समोर ठेवले होते. हे आव्हान वेलिंग्टनने ९ षटकांच्या आतच डिवाईनच्या शतकी खेळीच्या जोरावर एकही विकेट न गमावता पूर्ण केले. यावेळी डिवाईनने तिचे शतक केवळ ३६ चेंडूत पूर्ण केले होते. तर तिने एकूण ३८ चेंडूत नाबाद १०८ धावांची खेळी केली. या खेळीत तिने ९ चौकार आणि ९ षटकारांचा पाऊस पाडला.
याबरोबरच तिने महिला ट्वेंटी-ट्वेंटीमध्ये सर्वात जलद शतक करण्याचा विश्वविक्रमही केला आहे. तिने हा विक्रम करताना वेस्ट इंडिजच्या डिएन्ड्रा डॉटिनला मागे टाकले आहे. डॉटिनने २०१० मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ट्वेंटी-ट्वेंटी सामन्यात ३८ चेंडूत शतक केले होते.
न्यूझीलंडमध्ये सर्वात जलद शतक –
डिवाईनने न्यूझीलंडमध्ये सर्वात जलद ट्वेंटी-ट्वेंटी शतक करण्याचाही विक्रम केला असून तिने टीम सिफर्टला मागे टाकले आहे. सिफर्टने नॉर्दन डिस्ट्रिक्टकडून २०१७ मध्ये ४० चेंडूत माऊंट मोंगनूई येथे शतक केले होते.
याशिवाय डिवाईन ट्वेंटी-ट्वेंटीमध्ये सर्वात जलद शतक करणारी न्यूझीलंडची दुसऱ्या क्रमांकाची खेळाडूही ठरली आहे. या यादीत अव्वल क्रमांकावर मार्टिन गप्टिल असून त्याने वर्सेस्टरशायरकडून खेळताना नॉर्थम्पटनशायरविरुद्ध २०१८ मध्ये ३५ चेंडूत शतक झळकावले होते. तर दुसऱ्या क्रमांकावर डिवाईन आली असून तिने स्कॉट स्टायरीसला मागे टाकले आहे. त्याने ससेक्सकडून ग्लुसेस्टरशायरविरुद्ध ३७ चेंडूत शतक केले होते.
https://twitter.com/cricketwgtninc/status/1349533578237943808
या शतकानंतर डिवाईन म्हणाली, ‘मी सकाळी फार नर्वस होते. जेव्हा तुम्हाला खेळातून अपेक्षेपेक्षा अधिक कालावधीचा ब्रेक मिळतो, तेव्हा तुम्ही पुनरागमन करु शकाल की नाही या विचाराने नर्वस होता. त्यामुळे खेळपट्टीवर धावा केल्याने छान वाटले.’
महत्त्वाच्या बातम्या –
बीसीसीआय समोर अखेर झुकले ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्ड, हॉटेलमध्ये खेळाडूंना मिळाल्या ‘या’ सुविधा
श्रीसंत विरुद्ध जयस्वालचा हल्लाबोल, एकाच षटकात ठोकल्या ‘इतक्या’ धावा
चर्चा तर झालीच पाहिजे! ३७ चेंडूत शतक करणाऱ्या अझरुद्दीनला मिळाले रोहित, रिषभच्या पंक्तींत स्थान






