माजी भारतीय क्रिकेटपटू सौरव गांगुली गेल्या काही वर्षांपासून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआयचे) अध्यक्षपद सांभाळत आहेत. त्यांनी हे पद स्वीकारल्यापासून देशांतर्गत क्रिकेटमध्ये आणि भारतीय संघात अनेक मोठे बदल पाहायला मिळाले आहेत. सौरव गांगुली यांनी अध्यक्षपद स्विकारले त्यावेळीच म्हटले होते की, त्यांचे लक्ष देशांतर्गत क्रिकेट मजबूत करण्याचे असणार आहे. तसेच त्यांच्याच अध्यक्षतेखाली माजी भारतीय क्रिकेटपटू राहुल द्रविड यांनी भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. आता सौरव गांगुली यांनी राहुल द्रविड यांच्याबद्दल एक मोठा खुलासा केला आहे.
तुम्हाला ऐकून आश्चर्य होईल की, राहुल द्रविड यांना भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षकपद नको होते. ते नॅशनल क्रिकेट अकॅडमीचे अध्यक्ष होते. त्यांचा अध्यक्षपदाचा कालावधी संपला होता. त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा या पदासाठी अर्ज केला होता. त्यावेळी सौरव गांगुली यांनी राहुल द्रविडची समजूत काढली होती.
सौरव गांगुली यांनी बोरिया मजुमदार यांच्या एका कार्यक्रमात म्हटले की, “एक वेळ तर अशी आली होती, जेव्हा आम्ही सर्वांनी आशा सोडली होती की, तो मुख्य प्रशिक्षकपद सांभाळेल. असे नव्हते की, त्याला मुख्य प्रशिक्षकपद नको आहे. परंतु, या कामात भरपूर वेळ जाणार होता. राहुल द्रविडला चांगलेच माहीत आहे की, भारतीय संघ जगातील सर्वात व्यस्त वेळापत्रक असलेला संघ आहे. त्यामुळे संघातील खेळाडूंना दीर्घ काळ घरापासून दूर राहावे लागते. हेच कारण होते, ते मुख्य प्रशिक्षकपद स्वीकारण्यास नकार देत होते.”
तसेच ते पुढे म्हणाले की, “माझ्या आणि जय शाहाच्या मनात आधीपासूनच राहुल द्रविडचे नाव होत. परंतु, त्याला ते मान्य नव्हते. त्याला माहित होते की, राष्ट्रीय संघासाठी काम करणे म्हणजे आपल्याला ८-९ महिने घरापासून दूर राहावे लागेल आणि त्याची दोन लहान मुले आहेत. एक वेळ तर अशी आली होती की, आम्ही हार मानली होती. त्यांनी नॅशनल क्रिकेट अकॅडमीच्या अध्यक्ष पदासाठी अर्ज केला होता , हा अर्ज मान्य करत त्यांना अध्यक्षपद देण्यात आले होते. तरी देखील आम्ही त्याच्या मागे लागलो होतो आणि त्याला हे पद स्वीकारण्यासाठी मनवले.”
“जेव्हा खेळाडूंना विचारण्यात आले की, तुम्हाला कसा मुख्य प्रशिक्षक हवा आहे? त्यावेळी सर्वांना राहुल द्रविड सारखे प्रशिक्षक हवे होते. ही गोष्ट आम्ही राहुल द्रविडला सांगितली. मी त्यांना कॉल केला आणि सांगितले की, हे कठीण असेल परंतु २ वर्ष करून पाहा. जर कठीण वाटले तर नंतर काहीतरी मार्ग काढू,” असे सौरव गांगुली म्हणाले.
महत्वाच्या बातम्या –
सिराजचा ‘जबरा फॅन’ बनला किवी दिग्गज; तुफानी गोलंदाजी पाहून म्हणतोय…
शतकांचा दुष्काळ कधी संपणार ? विराटने दिले ‘हे’ उत्तर
पुण्यापासून लंडनपर्यंत चर्चेत असलेला ‘तो’ अंपायर आहे कोण? व्हिडिओने सोशल मीडियावर लावलीय आग