---Advertisement---

आता टीम इंडियाही खेळू शकते दिवस-रात्र कसोटी सामना!

On: शनिवार, ऑक्टोबर 26, 2019 12:03 PM
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली दिवस-रात्र कसोटी खेळण्याच्या विचाराबाबद सहमत असल्याचे बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुलीने शुक्रवारी स्पष्ट केले आहे.

गुरुवारी बांगलादेश विरुद्धच्या क्रिकेट मालिकांच्या संघनिवडीसाठी झालेल्या निवड समीतीच्या बैठकीत गांगुली विराट आणि रोहित शर्माला भेटला होता. यादरम्यान त्यांच्यात दिवस-रात्र कसोटी सामन्याबद्दल चर्चा झाली असल्याची शक्यता आहे.

शुक्रवारी इडन गार्डनवर बंगाल क्रिकेट असोसिएशनने गांगुलीचा सन्मान करण्यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमादरम्यान गांगुलीने विराट दिवस-रात्र कसोटी खेळण्यास सहमत असल्याचे सांगितले.

गांगुली म्हणाला, ‘आम्ही सर्वच जण यावर विचार करत आहे. याबद्दल नक्कीच काहीतरी करु. मी दिवस-रात्र कसोटीचा समर्थक आहे. तसेच कोहलीही यासाठी सहमत आहे. मी याआधी वृत्तपत्रामध्ये अनेक रिपोर्ट पाहिले होते की तो सहमत नाही, पण हे खरे नाही.’

‘हा खेळ पुढे गेला पाहिजे आणि त्यासाठी हा एक मार्ग आहे. चाहते त्यांचे काम संपवून चॅम्पियन्सला खेळताना पहायला येऊ शकतात. मला माहित नाही हे(दिवस-रात्र कसोटी) केव्हा होईल. पण होईल नक्की.’

त्याचबरोबर गांगुलीने असेही म्हटले आहे की ‘सर्व स्तरावरील क्रिकेटपटूंना मदत करणे हे माझे काम आहे. ज्या खेळाडूंना भारतासाठी खळण्याची संधी मिळाली नाही, त्यांनाही चांगल्या सुविधा मिळायला हव्यात ही माझी महत्त्वकांक्षा आहे. तसेच माझी एक महत्वाकांक्षा म्हणजे क्रिकेटला विश्वासार्ह आणि स्वच्छ करणे.’

गांगुलीची बीसीसीआयच्या अध्यक्षपदी 23 ऑक्टोबरला अधिकृतरित्या नियुक्ती करण्यात आली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---