भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) नुकतेच टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी भारताच्या १५ सदस्यीय संघाची घोषणा केली. यादरम्यान बीसीसीआयने अनेक आश्चर्यकारक निर्णय घेतले. त्यातीलच एक म्हणजे महेंद्रसिंग धोनीला भारतीय संघाचा मार्गदर्शक(मेंटर) म्हणून निवडण्यात आले आहे. याबाबत बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी आपले मत मांडले आहे.
गांगुलीने सांगितले की, महेंद्रसिंग धोनीला आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी त्याच्याकडे असलेल्या अनुभवाचा फायदा घेण्यासाठी भारतीय संघाचा मार्गदर्शक म्हणून निवडण्यात आले आहे.
याबाबत गांगुलीने बीसीसीआयच्या एका ट्विटमध्ये लिहिले आहे की, “धोनीला संघात सामील करणे म्हणजे टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी त्याच्याकडे असलेल्या पूर्ण अनुभवाचा फायदा घेण्याचा एक मार्ग आहे. मी धोनीचे आभार मानतो की, त्याने या स्पर्धेसाठी भारतीय संघाची मदत करण्याच्या प्रस्तावाचा स्वीकार केला.”
.@SGanguly99, President, BCCI is delighted with the move to have @msdhoni on board as #TeamIndia mentor for the #T20WorldCup 👏 👍 pic.twitter.com/9Ec4xdhj5d
— BCCI (@BCCI) September 9, 2021
धोनीने त्याच्या नेतृत्वपदात भारतीय संघाला २ वेळा विश्वचषक स्पर्धेचे जेतेपद मिळवून दिले होते. त्याच्या नेतृत्त्वाखाली २००७ साली दक्षिण आफ्रिकामध्ये झालेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत आणि २०११ साली भारतात झालेल्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने बाजी मारली होती. धोनी सध्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्ये चेन्नई सुपर किंग्स संघाचा कर्णधार आहे. तसेच धोनी सध्या आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यासाठी यूएईमध्ये आहे. तिथे त्यांच्या सराव सत्राला देखील सुरुवात झाली आहे.
दरम्यान, भारतीय संघाने आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी अनेक युवा खेळाडूंना संधी दिली आहे. तर असेही काही खेळाडू आहेत ज्यांची निवड होणे अपेक्षित होते, मात्र त्यांना संघातून वगळण्यात आले. ज्यामध्ये युजवेंद्र चहल आणि शिखर धवन यांचा समावेश आहे. तर दुसरीकडे तब्बल ४ वर्षांनंतर आर अश्विनला भारताच्या मर्यादित षटकांच्या सामन्यात खेळण्याची संधी मिळाली आहे.
या स्पर्धेत भारतीय संघाचा पहिला सामना पारंपारिक प्रतिस्पर्धी समजल्या जाणाऱ्या पाकिस्तान विरुद्ध २४ ऑक्टोबरला होणार आहे. पाकिस्तान, न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान या संघांसोबत भारतीय संघ ब गटात आहे. तर २ संघ पात्रता फेरीतून निवडले जाणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
–भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याची घोषणा; वनडे, टी२०, कसोटी मालिकेचे जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
–सातत्याने निशाणा साधणाऱ्या गंभीरनेच धोनीला मेंटर करण्याच्या निर्णयाला दिला पाठिंबा, म्हणाला…
–कोहलीने रोहितसह करावी सलामीला फलंदाजी, तर केएल राहुलने ‘या’ क्रमांकावर खेळावे, गावसकरांनी सुचवले पर्याय