भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि सध्याचा बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुली याची गुरुवारी (२८ जानेवारी) दुसऱ्यांदा अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. यादरम्यान त्याच्या हृद्यात दोन स्टेंट बसवण्यात आले आहेत. सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे. गांगुलीला बुधवारी छातीत वेदना होत असल्याने अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्याच्यावर याच महिन्याच्या सुरुवातीला पहिली अँजिओप्लास्टी करण्यात आली होती.
यासंदर्भात न्यूज एजन्सी एएनआयशी बोलताना गांगुलीने सांगितले की, “माझी अँजिओप्लास्टी यशस्वीरित्या पार पडली आहे. माझ्या हृद्यात दोन स्टेंट लावण्यात आले आहेत.”
तसेच डॉक्टरांनी माहिती दिली आहे की, “गांगुलीला अँजिओप्लास्टीनंतर रात्री शांत झोप लागली होती. त्याने सकाळी उटल्यानंतर हलका नाश्ताही केला आहे. शुक्रवारी (२९ जानेवारी) त्याच्या अजून काही चाचण्या करण्यात येतील. त्यानुसार पुढील निर्णय घेतले जातील.”
https://twitter.com/ani_digital/status/1354772613885661186?s=20
याआधी ३ जानेवारीला सकाळी जिममध्ये व्यायाम करताना गांगुलीने छातीत दुखू लागल्याची तक्रार केली होती. त्यामुळे त्याला लगेचच कोलकातामधील वुडलँड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे त्याच्यावर अँजिओप्लास्टी पण करण्यात आली होती. त्याच्या हृदयाच्या रक्तवाहिन्यात ३ ब्लॉकेजेस असल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे त्याच्या हृदयाच्या रक्तवाहिनीत एक स्टेंट टाकण्यात आला होता. त्यानंतर ५ दिवसांनी त्याला घरी देखील सोडले होते.
बुधवारी त्याने जेव्हा त्रास होत असल्याची पुन्हा तक्रार केली होती, तेव्हा त्याच्यासाठी कोलकाता पोलिसांनी त्याला जवळच्या हॉस्पिटलमध्ये पोहचवण्यासाठी ग्रीन कॉरिडोर बनवला होता.
सौरव गांगुलीची कारकिर्द –
बीसीसीआयचा विद्यमान अध्यक्ष गांगुलीने भारतीय क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्त्व केले आहे. त्याने १९९२ ते २००८ या कालावधीत भारताकडून क्रिकेट खेळले आहे. दरम्यान त्याने ३११ वनडे सामने खेळले असून ११३६३ धावा केल्या आहेत. यात त्याच्या २२ शतकांचा समावेश आहे. तसेच त्याने कसोटी क्रिकेटमध्ये ११३ सामने खेळले असून ७२१२ धावा केल्या आहेत. दरम्यान त्याने एक द्विशतक आणि १६ शतके लगावली आहेत. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर त्याची २०१९ साली बीसीसीआयचा अध्यक्ष म्हणून निवड झाली.
महत्त्वाच्या बातम्या-
सौरव गांगुलीच्या झाल्या अनेक चाचण्या; हॉस्पिटलने दिले प्रकृतीबाबत मोठे अपडेट्स
मोठी बातमी! सौरव गांगुलीची तब्येत पुन्हा बिघडली; हॉस्पिटलमध्ये दाखल
जसप्रीत बुमराह विरुद्ध रणनीती आखणे महाकठीण; इंग्लंडचा सलामीवीर रोरी बर्न्सची प्रतिक्रिया




