लॉर्ड्सवर 2002 मध्ये भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने केलेल्या त्या खास सेलिब्रेशनची 24 वर्षांनंतर पुनरावृत्ती झाली आहे. लॉर्ड्सच्या प्रसिद्ध गॅलरीमध्ये गांगुलीच्या जर्सी हलवतानाचे सेलिब्रेशन यंदा भारताच्या मिश्र दिव्यांग क्रिकेट संघाने केले आहे. त्यांच्या या जल्लोषाचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
बुधवारी (19 ऑगस्ट) लॉर्ड्सवर झालेल्या टी 20 सामन्यात भारताने इंग्लंडला 118 धावांनी पराभूत केले. या विजयाचे सेलिब्रेशन भारतीय खेळाडूंनी आणि अधिकाऱ्यांनी आपले शर्ट काढून हवेत फिरवत केले. याच मैदानावर 2002 मध्ये इंग्लंडविरुद्ध नॅटवेस्ट ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात विजय मिळवल्यानंतर गांगुलीने जर्सी काढून जल्लोष केला होता. तो क्षण चाहत्यांच्या चांगलाच स्मरणात असून आता भारताच्या आणखी एका संघाने केलेल्या जल्लोषाने त्याची आठवण आली आहे.
या जल्लोषाचा व्हिडिओ डिफरंटली एबल्ड क्रिकेट कौन्सिल ऑफ इंडियाने सोशल मीडियावर शेअर केला आहे. लॉर्ड्स येथे ‘फेस्टिव्हल ऑफ डिसॅबिलिटी क्रिकेट’ स्पर्धेचे आयोजन केले जाते.
या पराभवामुळे इंग्लंडची लॉर्ड्सवर पहिल्या विजयाची प्रतीक्षा कायम आहे. पराभवानंतर इंग्लंडचा कर्णधार कॅलम फ्लिन म्हणाला, “आमच्यासाठी हा खूपच निराशाजनक शेवट होता. या मालिकेत आम्ही खूप संघर्ष केला आणि अनेक गोष्टी योग्य घडल्या. मला वाटले आम्ही विजयाने शेवट करू, मात्र तसे झाले नाही. आमच्यापैकी अनेकांना माहित आहे, येथे त्यांना पुन्हा खेळण्याची संधी मिळणार नाही, मात्र आमचे पुढील ध्येय येथे विजय मिळवणे आहे.”
सात सामन्यांच्या या टी 20 मालिकेतील हा शेवटचा सामना होता. यामध्ये भारताने चार विकेट्स गमावत 206 धावा केल्या होत्या, जी संघाची सर्वोच्च धावसंख्या होती. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ 88 धावांवर सर्वबाद झाला आणि भारताच्या दिव्यांग संघाने 118 धावांनी विजय मिळवत मालिका पूर्ण केली. तसे ही मालिका इंग्लंडने आधीच जिंकली होती.
या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने 29 धावांनी जिंकला होता. पुढील दोन्ही सामने भारताने जिंकत मालिकेत आघाडी घेतली होती, मात्र इंग्लंडने विजयाची हॅट्ट्रीक केली. त्यामुळे लॉर्ड्सच्या सामन्याआधी इंग्लंडने मालिकेत 4-2 अशी विजयी आघाडी घेतली होती. इंग्लंडने ही मालिका 4-3 अशी जिंकली.
मालिका जरी इंग्लंडने जिंकली असली तरी, शेवटचा विजय आणि भारताचे सेलिब्रेशन चांगलेच लक्षात राहिल. (Sourav Ganguly-style celebration on Lord’s balcony! India beat England Festival of Disability Cricket tournament video.)






