रविवारी (3 नोव्हेंबर) दिल्ली (Delhi) येथे भारत विरुद्ध बांगलादेश (First T20Match India vs Bangladesh) संघात पहिला टी20 सामना पार पडला. या सामन्यात भारताला 7 विकेट्सने पराभव स्विकारावा लागला.
हा सामना संपल्यानंतर बीसीसीआयचे नवे अध्यक्ष सौरव गांगुलीने (Sourav Ganguly) भारताचा प्रभारी कर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma) आणि बांगलादेश क्रिकेट संघाला धन्यवाद दिले आहे.
मागील दिवसांपासून दिल्लीमध्ये प्रदुषणाच्या समस्या जाणवत आहेत. परंतू असे असतानाही भारत आणि बांगलादेश संघातील पहिला टी20 सामना दिल्लीत पार पडला. त्यामुळे प्रदूषणाच्या परिस्थितीतही भारत आणि बांगलादेश संघाने हा सामना खेळल्याने गांगुलीने त्यांचे आभार मानले.
गांगुलीने ट्विट केले आहे की ‘कठिण परिस्थितीतही हा सामना खेळल्याबद्दल दोन्ही संघांना धन्यवाद. बांगलादेश संघाने चांगला खेळ केला.’
Thank u to both the teams to play this game @ImRo45 @BCBtigers under tuff conditions .. well done bangladesh ..
— Sourav Ganguly (@SGanguly99) November 3, 2019
दिवाळीनंतर दिल्लीतील प्रदूषणाची पातळी धोकादायक ठरत आहे. अशा परिस्थितीत हा सामना रद्द होण्याच्या मार्गावर होता. तसेच काही दिवसांपूर्वी या सामन्याच्या ठिकाणात बदल करण्यात यावेत अशीही मागणी होत होती. परंतु, गांगुलीने मैदान बदलण्यासाठी उशीर झाल्याचे सांगितले होते.
डिसेंबर 2017मध्ये श्रीलंके विरुद्ध दिल्लीत झालेल्या कसोटी सामन्यादरम्यानही प्रदुषणाच्या समस्या जाणवल्या होत्या. त्यावेळी श्रीलंकेच्या काही खेळाडूंना प्रदुषणामुळे त्रास झाला होता.
रविवारी(3 नोव्हेंबर) दिल्लीत झालेल्या भारत विरुद्ध बांगलादेश सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना नियमित अंतराने विकेट गमावत 20 षटकात 6 बाद 148 धावा केल्या होत्या.
त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या बांगलादेश संघाने 149 धावांचे आव्हान 19.3 षटकात सहज पार केले. बांगलादेशकडून मुश्फिकुर रहिमने 1 षटकार आणि 8 चौकारांच्या मदतीने नाबाद 60 धावा करत विजयात सिंहाचा वाटा उचलला. बांगलादेशचा हा भारतीय संघाविरुद्धचा पहिला टी20 विजय आहे.